
विधानसभा निवडणुकीत वेगवान घडामोडी घडत आहेत. सध्या कोण कोणत्या पक्षात आहेत? कोण कोणाचा उमेदवार आहेत यावरून मतदारच संभ्रमात आहेत. अशा वेळी शिवसेना ठाकरे गटाने एका मतदार संघात चक्क भाजप उमेदवारालाच पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.
तसे लेखी पत्रकाच काढण्यात आले आहे. शिवाय या पत्रावर मतदार संघातल्या शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्याही आहेत. हे पत्र सध्या जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे सध्या चालले आहे तरी काय असा प्रश्न विचारला जात आहे.
सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदार संघात भाजपने गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदार संघा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. काँग्रेसने इथं विद्यमान आमदार विक्रम सावंत यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथं शिवसेना ठाकरे गटाचा काँग्रेसला पाठिंबा अपेक्षीत होता. मात्र इथं झालं भलतचं. भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर यांना जत युवा सेनेकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला.
त्याबाबतचे पत्रकही काढण्यात आले आहे. जतच्या युवा सेनेला विधानसभा निवडणूकीत काँग्रेसकडून विश्वासात घेण्यात येत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळेच गोपिचंद पडळकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात आल्याचं युवा सेनेनं स्पष्ट केले आहे. पाठिंबा दिल्याचे पत्रक युवासेनेनं काढले असून त्यात भाजप उमेदवार गोपिचंद पडळकर हे अधिकृत उमेदवार असून त्यांना पाठिंबा देत असल्याचं यात म्हणण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर धुमाळ यांनी हे पत्रक काढलं आहे.
या पत्रकानंतर महाविकास आघाडीत जत विधानसभा मतदार संघात एक खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सांगली शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांना पुढे येत स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. कोणत्याही पदावर नसताना ज्ञानेश्वर धुमाळ यांनी जुने लेटरहेड वापरून पाठिंब्याचे पत्र काढले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी सांगितलं आहे. शिवा. लेटरहेड वापरून बोगस पाठिंबा दिल्या प्रकरणी ज्ञानेश्वर धुमाळ व इतरांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात येणार असल्याचे संजय विभूतेंनी स्पष्ट केलं.