
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत आहे. काल गुरुवारीही सेन्सेक्स-निफ्टीने जोरदार सुरुवात केली आणि काही वेळाने पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले.
मात्र केवळ शेअर बाजारच नाही तर सोन्यामध्येही सातत्याने घसरण होत आहे. 1 नोव्हेंबरपासून सोन्याचे भाव 5000 रुपयांनी घसरले आहेत, म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने स्वस्त झाले आहे.
सोन्याच्या भावात यंदा मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. एकीकडे, मोदी 3.0 (केंद्रीय अर्थसंकल्प 2024) च्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या दरम्यान, सरकारने सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी हटवण्याची घोषणा केल्यानंतर त्यात मोठी घसरण झाली, तर दुसरीकडे त्यानंतर पुढच्याच महिन्यापासून सोन्याचे भाव पुन्हा वाढले.
पुन्हा सोन्याने सर्व तेजीचे रेकॉर्ड मोडीत काढले. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या भावात घसरण होत आहे. गुरुवारीच मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याचा भाव 10 ग्रॅमचा दर 700 रुपयांहून अधिक घसरला.
गेल्या दोन आठवड्यांतील MCX वर सोन्याच्या भावातील बदल पाहिल्यास, गुरुवारी, 14 नोव्हेंबर, 2024 रोजी सोने 73,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर घसरले. त्यानुसार 1 ते 14 नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या भावात प्रति 10 ग्रॅम 5,117 रुपयांची मोठी घसरण झाली आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजसह देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या भावात घसरण दिसून आली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोन्याचे भाव खालील प्रमाणे आहेत.
गुणवत्ता भाव(IBJA नुसार)
24 कॅरेट – रु 75,260/10 ग्रॅम
22 कॅरेट- रु 73,450/10 ग्रॅम
20 कॅरेट – रु 66,980/10 ग्रॅम
18 कॅरेट – रु 60,960/10 ग्रॅम
देशांतर्गत बाजारात सोन्याची ही किंमत 3 टक्के जीएसटी आणि मेकिंग चार्जशिवाय आहे. मेकिंग चार्जेस वेगवेगळे असतात आणि त्यामुळे देशातील विविध शहरांमध्ये सोन्याच्या भावात बदल दिसून येत आहेत.
अनिश्चित वातावरणात सोनेच पर्याय!
युद्धजन्य स्थिती, राजकीय अस्थिरतेच्या काळात सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. केंद्रीय बँकांसाठीही सोने हाच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय राहील, असे संस्थात्मक गुंतवणूकदार हाताळणाऱ्या रोबेकोच्या मनी मॅनेजरचा दावा आहे.
भाव का पडत आहेत..?
अमेरिकन डॉलरची ताकद आणि रोखे उत्पन्न यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीवर दबाव राहिला आहे. यूएस डॉलर इंडेक्स (106.59) 1 वर्षातील सर्वोच्च स्तरावर आहे; तर यूएस बॉन्ड उत्पन्न त्यांच्या जुलैच्या उच्च पातळीवर आहे. गेल्या 5 दिवसांत, यूएस डॉलर इंडेक्स आणि 10 वर्षीय यूएस बॉन्ड यिल्ड अनुक्रमे 2 टक्के आणि 13 बेसिस पॉइंट्सने मजबूत झाले आहेत.