
विधानसभा निवडणूक(Vidhansabha Election) नुकतीच पार पडली आहे. 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्याआधीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणीत वाढ झाली.
अजित पवार यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले. अजित पवारांना 16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आले.
काय आहे प्रकरण?
अजित पवारांना ज्या प्रकरणासाठी नोटीस पाठवण्यात आली ते 2014 मधील प्रकरण आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी बारामती तालुक्यातील मतदारांना धमकी दिली होती. त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही अजित पवार मासाळवाडी या गावात गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना मतदान न केल्यास गावाचे पाणी बंद करू, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणीप्रश्न आम्ही दोन महिन्यात सोडवू, पण आम्हालाच मतदान करा, असेही ते म्हणाले होते.
दरम्यान, आता दहा वर्षानंतर कोर्टाने अजित पवारांना या प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांनी माध्यमांना ही माहिती दिली. अजित पवार यांनी 2014 च्या निवडणुकीत उमेदवाराला मत न दिल्यास गावाचे पाणी बंद करू, असं वक्तव्य केल्याने हे समन्स बजावल्याचं खोपडे म्हणाले.
2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी एकसंध होती. त्यामुळेच अजित पवार हे सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करत होते. मात्र 10 वर्षांनंतर पुलाखालून बरचं पाणी वाहून गेलं. राष्ट्रवादीत फुट पडून पक्षाची दोन शकलं झाली आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकांच्या विरोधात आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकेकांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता.