
पुणे, २० नोव्हेंबर २०२४
लोकशाही प्रक्रियेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारती विद्यापीठ महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने ११ ते १६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन केले.
११ नोव्हेंबरला मतदान जनजागृती सत्रात विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व, जबाबदाऱ्या आणि निवडणूक प्रक्रियेबद्दल माहिती देण्यात आली. १४ नोव्हेंबरला मतदार शपथविधी सत्रात विद्यार्थ्यांनी संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा योग्य उपयोग करण्याची शपथ घेतली. १६ नोव्हेंबरला उत्साहपूर्ण मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्य, पोस्टर्स आणि घोषवाक्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती केली.
आपल्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव म्हणाले, “लोकशाही प्रक्रियेचे महत्त्व तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ जागरूकता निर्माण होत नाही, तर जबाबदार नागरिक होण्याची जाणीवही निर्माण होते.” त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपक्रम अधिक यशस्वी ठरला.
या उपक्रमाच्या समन्वयक प्रा. डॉ. स्मिता जाधव, प्रा. सविता इटकरकर आणि प्रा. डॉ. गौरी पाटील यांनी प्रभावी संयोजन केले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार मतदार होण्याची जाणीव निर्माण झाली आणि लोकशाही प्रक्रियेला बळकटी मिळाली. या अभिनव उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत आहे.