
विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांमध्ये लागणार असून राज्यात कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईल. महाविकास आघाडीकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांशी आम्ही संपर्कात असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सांगितलं.
नाना पटोले म्हणाले की, भाजपने ज्या पद्धतीने अपक्षाला सपोर्ट केलाय आणि शिंदेंच्या उमेदवारांना विरोध केलाय, असेही उमेदवार आमच्या संपर्कात आहेत.
सरकार स्थापनेबाबतही नाना पटोले यांनी मोठं विधान केलंय. नाना पटोले यांनी म्हटलं की, शक्यतो उद्या संध्याकाळी आम्ही सत्तास्थापनेचा प्रयत्न करणार. वेळ कमी असल्यामुळे सगळ्या आमदारांनी बोलावण्यासाठी लवकरात लवकर आण्यासाठी फ्लाईट सगळी जुळवाजुळव करावी लागणार आहे.
महाविकास आघाडीची सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महायुतीवर टीका करताना म्हटलं होतं की, महायुतीचं सरकार आलं तर भाजप नेते अदानींनासुद्धा मुख्यमंत्री करतील.याबद्दल नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की, संजय राऊत हे हायकमांड आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही. संजय राऊत यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देणं नाना पटोले यांनी टाळलं.
मतदानाची आकडेवारी आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर शंका व्यक्त करताना नाना पटोले म्हणाले की, मतदानाची टक्केवारी ६५ टक्के होती ती ६६ टक्के झाली. निवडणूक आयोगाची यंत्रणा चुकीची आहे, लोकसभेला असाच प्रकार झालेला, निवडणूक आय़ोगाकडे तक्रार केली तरी ते बरोबर आहे म्हणातत. १७ सी जमा केलेला आहे. महत्त्वाचं कागदपत्र आमच्याकडे आहे. त्यामुळे मतदान वाढीच्या नंतरच्या प्रक्रियेत काही दोष आढळला तर निवडणूक आय़ोग दोषी राहील.
मविआच्या बैठकीला नाना पटोले उपस्थित नव्हते. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या बैठकीबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले की, मी काल बैठकीला नव्हतो आणि माहुरच्या देवीला गेलो होतो. आम्हाला श्रीराम, देवी सगळे पावतील असंही ते म्हणाले.
स्ट्राँग रूमबाहेर पहारा ठेवण्यास सांगण्यात आलाय. तुम्हाला गडबड वाटते का या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले की, गडबड होण्याची शक्यता वाटते. अर्ध्या रात्रीनंतर ट्रक जे जातात ते तपासायला सांगितले आहे. महायुतीवाले काहीही पाप करू शकतात. संपूर्ण रात्र आणि उद्या सकाळपर्यंत सगळं टाइट करणार आहे. काही ठिकाणी अटीतटीच्या निवडणुकीचं चित्र आहे. त्यामुळे काही अधिकारीसुद्धा गडबड करू शकतात ही भीतीही आहे. त्यांनी दखल घ्यावी, जनमताच्या बाजूने रहावं, चुकीचं करू नये असा सल्ला आमचा राहणार आहे.