
विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या तर शिवसेना शिंदे गटाने ५७ जागा मिळवल्या. शिवसेनेत फूट पडल्यानतंर एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचा वेगळा गट बनवला.
या गटाने आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हणत मविआतून बाहेर पडत पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनले होते.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर सर्व आमदार आधी सुरतला गेले होते. तिथून गुवाहाटीला आमदारांचा मुक्काम होता. त्यानंतर महाराष्ट्रात परत येताच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले होते. शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे म्हटलं होतं की, पन्नासपैकी एक आमदार जरी पडला तर मी राजकारण सोडेन आणि गावी शेती करायला जाईन. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्याचीही आता चर्चा होत आहे.
शिवसेनेत फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी पाच जणांचा पराभव झाला. यात सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचाही समावेश आहे. काय झाडी, काय डोंगार डायलॉगमुळे शहाजीबापू पाटील चर्चेत आले होते. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला. महायुतीत माहिमच्या जागेचीही मोठी चर्चा झाली होती. भाजपकडून मनसेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली गेली होती. तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. सदा सरवणकर यांना इथं पराभवाचा धक्का बसला. शिंदेंसोबत गेलेल्या पण पराभूत झालेल्या आमदारांमध्ये संजय रायमुलकर, यामिनी जाधव, ज्ञानराज चौगुले यांचाही समावेश आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतरही शिंदेंनी दमदार कामगिरी केलीय. २०१९ मध्ये शिवसेनेनं ५६ जागा जिंकल्या होत्या. फूट पडल्यावर रोष असतानाही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबतचे उमेदवार निवडून आणलेच, शिवाय २०१९ पेक्षा एक जागा जास्त जिंकली. शिंदे गटाने ५७ जागा जिंकल्या आहेत.