
विधानसभा निवडणुकीत महायुतीची जोरदार मुसंडी मारली. 234 जागांवर दणदणीत विजय मिळवला. महाविकास आघाडीचा सुफडा साफ केला आहे. आता महायुतीमध्ये आता मंत्रिपदावरुन घोडं अडण्याची शक्यता आहे.
महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
आज मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार यावर चर्चा होणार असून नाव आज फायनल केलं जाईल. तर तिन्ही पक्षाने आपले गटनेते ठरवले आहेत. राष्ट्रावादी पक्षाने अजित पवार यांचं नाव गटनेता म्हणून बैठकीत ठरवलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नावाचीही शिवसेनेचा गटनेता म्हणून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपकडून गटनेतेपद कुणाला दिलं जाणार याचीही प्रतीक्षा आहे.
उद्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शपथविधी सोहळ्याआधी चर्चा सुरू झाली आहे ती जागा वाटपावरून, कोणत्या पक्षाला किती जागा जाणार, महत्त्वाची खाती भाजप आपल्याकडे ठेवणार का हे देखील पाहावं लागणार आहे. नुकतंच एक फॉर्म्युला चर्चेत आला आहे. त्यानुसार भाजपकडे सर्वाधिक जागा जाऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
महायुतीत मंत्रिपदासाठीच्या वाटपासाठी एका फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सहा ते सात आमदारांच्या मागे एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे सध्या 132 आमदार त्यामुळे फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 22-24 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या 57 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 10-12 मंत्रिपदं मिळतील असा अंदाज आहे. राष्ट्रवादी कांग्रेसला 41 जागा आल्याने त्यांच्या वाट्याला 8-10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, महायुतीचे प्रमुख तिन्ही नेते बसून यावर चर्चा करणार असल्याची माहिती मिळाली आहे.