
विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळाले. मात्र या यशानंतर आता विरोधी पक्षाकडून जोरदार हल्ले सुरु आहेत. महाविकास आघाडीने ईव्हीएमवर खापर फोडल्यानंतर आता मनसेनेही या वादात उडी घेतली आहे.
ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे, असं मत मनसेच्या नेत्याने मांडलंय. मनसेच्या या भूमिकेनंतर आता पुन्हा ईव्हीएमबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत.
मनसे नेते नेमकं काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता मनसेकडून याबाबत प्रतिक्रीया समोर आली आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी याबाबत प्रतिक्रीय दिली. ते म्हणाले, मागच्या काही दिवसापासून जे व्हिडिओ समोर येत आहेत. ते पाहता हा निकाल कसा मॅनेज केला, हे लक्षात येते. हा निकाल आम्हालाच काय, कुणालाच मान्य नाही. जे आमदार पाच-दहा वर्षे भेटत नव्हते, ते आमदार लाखाच्या मतांनी निवडून आलेत. ईव्हीएमशिवाय हा निकाल अशक्य आहे. ईव्हीएमने घात केला. ईव्हीएममुळे अनेक पक्षांना उतरती कळा लागली आहे, असं आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला.
हा निकाल सेट होता- जाधव
जाधव पुढे म्हणाले, एवढा मोठा विजय मिळवूनही, भारतीय जनता पक्षात आनंद व्यक्त होत नाही. अमेरिकासारख्या देशात बॅलेट पेपरवर मतदान होत असेल, तर मग इथे ईव्हीएम कशाला पाहिजेत..? असा सवाल करत जाधव म्हणाले, या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेची आणि मनसे फसवणूक झाली आहे. न्यायालयही त्यांचच, निवडणूक आयोगही त्यांचाच… मग आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? या पुढच्या निवडणुका लढवायच्या की नाही, असा प्रश्न आम्हाला पडला आहे, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.
राज ठाकरे मांडणार त्यांची भूमिका
अविनाश जाधव पुढे म्हणाले की, ईव्हीएमबाबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका मांडतील. निवडणुकीत भाजपची लाट दिसत नव्हती तर राग दिसत होता. मात्र निवडणुकीपूर्वी एक पिक्चर तयार केला गेला. त्यात लाडकी बहीण बसवली, बटेंगे तो कटेंगे बसवलं. हे सगळं मॅनेज होतं, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं. ते पढे म्हणाले, निकालानंतर मनसेच्या बैठकीत राज ठाकरे काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. लवकरच राज ठाकरे यावर बोलणार आहेत. ते जेव्हा बोलतील त्यावेळी या निवडणुकीमध्ये काय काय झालं, हे राज्याला कळेल, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.