
मागील अडीच वर्षांपासून मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणारे एकनाथ शिंदे यांनी आज आपण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर जात असल्याचं स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जो काही निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, असं शिंदेंनी जाहीर केलं आहे.
तसंच, लाडक्या बहिणींचा भाऊ ही पदवी सीएमपदापेक्षा मोठी आहे, असं म्हणताना शिंदे भावुक झाले होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय होत नसल्याने सेना-भाजप अशा दोन्ही पक्षांत नाराजी होती. आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, यासाठी सेना-भाजपचे कार्यकर्ते प्रचंड आग्रही होते. परंतु भाजपकडून एकनाथ शिंदे यांना स्पष्ट निरोप देण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली.
एकनाथ शिंदेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
मी सुद्धा शेतकरी कुटुंबातून आलो आहे. मी कसं काट कसर करायचो. माझ्या आईबद्दल मी भाषणात नेहमी सांगितलं. लाडके भाऊ असेल, बहिणी असतील, यांचा सगळ्यांचा विचार केला. अडीच वर्ष आम्ही काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी पाठिंबा दिला आहे. मी समाधानी आहे. आता सगळे जण म्हणत होते, कुठे गेले. कुठे बसले. पण एक सांगतो मी नाराज नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. लढून काम करणारे आहोत. एवढा मोठा विजय मिळाला आहे. आतापर्यंतच्या विजयामुळे याची गणना ऐतिहासिक होत आहे. जीवतोडून मेहनत घेतली, काम केलं, लोकांमध्ये गेलो. लोकांमध्ये जाऊन काम करणारं सरकार आहे. माझ्या शरिरात रक्ताचा थेंब असेपर्यंत जनतेसाठी काम करणार आहे, असं शिंदे म्हणाले.
मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं यात माझा आनंद आहे. बहिणींना पैसे मिळाले. औषध, फीचे पैसे मिळाले आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये जनतेचं प्रेम मिळालं, त्यांना वाटतंय, जनतेला मुख्यमंत्री आहे. जनतेतला मुख्यमंत्री म्हणून ओळख मिळाली, याला खूप नशीब लागतंय. लोकप्रिय मुख्यमंत्री माध्यमांनीच ओळख दिली. मी जनतेसाठी काम केलं. लाडक्या बहिणींना भाऊ ही पदवी मला मुख्यमंत्रिपदापेक्षा खूप मोठी आहे, असं म्हणताना शिंदे यांना गहिवरून आलं.
‘राज्याला पुढे जायचं असेल तर केंद्राची ताकद आपल्यासोबत आहे. केंद्राची मदत कायम लागणार आहे. आता राज्यात जे काही बहुमत मिळालं आहे. कुठे घोड आडलं आहे, मी काहीही धरू ठेवलं नव्हतं. कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ पद मिळालं आहे. मी काल पंतप्रधान मोदींना फोन केला आणि सांगितलं सरकार बनवताना कोणती अडचणीचं काही आहे तर माझ्यामुळे कुणामुळे तर कधी मनात आणू नका. अडीच वर्ष संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या, तो निर्णय आम्हाला मान्य असेल. एनडीएचे प्रमुख म्हणून मान्य असेल’ असंही शिंदेंनी स्पष्ट केलं.
‘भाजपचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री बनवण्यासाठी जो काही निर्णय घेतली, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा राहणार आहे. त्याला शिवसेनाचा पाठिंबा राहणार आहे. भाजप जो काही निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असणार आहे. आधी महाविकास आघाडी स्पीडब्रेकर होती, आम्ही तो काढून टाकला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो काही निर्णय घेतली तो आम्हाला मान्य राहणार आहे. अभी तो नापी है मुठीभर जमीन, अभी तो सारा आस्मान बाकी है, त्यामुळे या राज्याला नंबर वन बनवलं आहे, असंही शिंदेंनी म्हणाले.