सिन्नर विधानसभा मतदार संघात निवडणुकीनंतर निकालाचे पडसाद उमटू लागले आहेत. यातून अतिउत्साही कार्यकर्त्यांनी वडझिरे या गावात चक्क विद्यमान खासदारांनाच प्रवेश बंदीचा फलक लावला.
सिन्नर हा सामाजिक दृष्ट्या अतिशय हॉट मतदार संघ मांनला जातो. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे हे उमेदवार होते. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे हे या निवडणुकीत सहज जिंकले.
येथे महायुतीचे आमदार माणिकराव कोकाटे विजयी झाली. सबंध राज्यभर महाविकास आघाडीचे पानिपत झाले. त्यात सिन्नरच्या उमेदवारालाही फटका बसला. मात्र अद्यापही सिन्नरमधील काही समर्थकांना हा निकाल मान्य नसावा, असे सध्याचे राजकीय चित्र आहे. या निकालाचे पडसाद सिन्नर तालुक्यातील काही गावांमध्ये उमटण्याची चर्चा होती.
वडझिरे (सिन्नर) या गावात सांगळे समर्थकांनी चक्क गावाच्या वेशीवर फलक लावला. या फलकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना गद्दार असे संबोधण्यात आले. या फलकावर खासदार वाजे आणि त्यांच्या कुटुंबीयांना गावात प्रवेश करण्यास मनाई आहे, असा फलक लावण्यात आला.
या फलकामुळे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया देखील आल्या. यानंतर मात्र गावातील जागरूक नागरिक पुढे आले. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. संबंधित फलक तातडीने काढून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
सध्या हा फलक काढून टाकण्यात आला आहे. मात्र फलक लावल्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे सबंध सिन्नर विधानसभा मतदारसंघात राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अतिशय नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अतिउत्साही युवकांनी हा फलक लावला होता. मात्र आता त्याची झळ अनेकांना बसण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकांवर देखील त्याचा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे सिन्नर मध्ये घडलेला हा प्रकार राज्यभर चर्चेत आला. मतदार संघात गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दोन समाजात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण व्हायची. गेल्या काही निवडणुकांमध्ये जाणीवपूर्वक केलेल्या प्रयत्नातून सामाजिक सलोखा निर्माण झाला.
विशेषतः खासदार वाजे यांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पुढाकार घेऊन उदय सांगळे यांच्या पत्नी शीतल सांगळे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा सन्मान मिळवून दिला होता. त्यामुळे या समाजामध्ये खासदार वाजे यांच्याविषयी आदराची भावना आहे. मात्र मध्यंतरी श्री. सांगळे वाजे यांच्यापासून दुरावले. ते शिंदे गटाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांच्हया जवळ होते. त्यामुळे विधानसभेला काही नेते सांगळे यांच्प्रया चारापासून अलिप्त राहिल्याचे बोलले जाते. त्यातच काही अतीउत्साही कार्यकर्त्यांनी केलेल्या आततायी कृत्याने हा सलोखा बिघडतो की काय, अशी स्थिती आहे.
