
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून तिढा सुरू आहे. आज, दिल्लीत महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबतचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहे. त्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुरू असताना बुधवारी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिल्लीत होणारा निर्णय मान्य असेल असे वक्तव्य केले. आपण पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयात आपला कोणताही अडसर राहणार नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपली दावेदारी मागे घेतली असल्याची चर्चा सुरू झाली. या घडामोडींवर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमा सोबत बोलताना महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
संजय शिरसाट यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतल्यावर अनेक शिवसैनिक नाराज झाले. एकनाथ शिंदे यांचा चेहरा खेडोपाडी गेला. एकनाथ शिंदे म्हणेज आपला माणूस अशी भावना तयार झाली. अनेक शिवसैनिकांची इच्छा होती की त्यांनी मुख्यमंत्री झाले पाहिजे. बुधवारी त्यांनी जाहीर केलेल्या निर्णयानंतर त्यांची राजकीय अजून उंची वाढली आहे. एकनाथ शिंदे ते कधीही रणांगणावरून बाहेर जाणार नाही, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे शांत बसणारे नाहीत…
संजय शिरसाट यांनी सांगितले की, त्यांचा स्वभाव पाहता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत. ते शांत बसणारे नाहीत. मला वाटतं पुढच्या आठवड्यात त्यांचे दौरे सुरू होणार आहेत. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रभर फिरणार आहेत. त्यांच्या राज्याच्या दौऱ्याची तारीख आता सांगता येणार नाही. एकनाथ शिंदे हे ‘भाऊ आपल्या भेटीला’ या वेगळे अभियान घेऊन येणार आहोत.
आज ठरणार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा
महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील राज्याचा मुख्यमंत्री कोण, याचा सस्पेन्स कायम आहे. निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात 234 जागा आल्या. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाबाबत तिढा सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे आज राजधानी दिल्लीत होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आज बैठक होणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होणार आहे.