
राज्यात महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली.
या बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी झाले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विविध प्रस्ताव सादर केले. मात्र, त्यावर भाजपने पर्याय दिला आहे. शिंदे यांनी प्रस्तावाला होकार दिल्यानंतरच सत्ता स्थापनेच्या हालचाली पुढे सुरू राहणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी ‘न्यूज 18 लोकमत’ला सांगितले.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची महत्त्वाची बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली. रात्री उशिरा एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीला भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्रिपद तसंच उपमुख्यमंत्रीपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाली आहे.
एकनाथ शिंदेंची शाह यांच्याकडे कोणती केली मागणी?
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर शिवसेनेची भूमिका मांडली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेसाठी 12 मंत्रिपदांची अमित शाह यांच्याकडे मागणी केली. त्यासोबतच विधान परिषदेच्या सभापतीपदाची देखील बैठकीत शिंदे यांच्याकडून मागणी करण्यात आली. त्याशिवाय गृह, नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी एकनाथ शिंदे यांनी केल्याचे सूत्रांनी दिली. पालकमंत्री पद देताना देखील पक्षाचा योग्य सन्मान राखावा अशी विनंतीही शिंदेनी अमित शाहांना केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीतील बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचं देखील पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंनी अमित शहांना सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या काही प्रस्तावावर भाजपने निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपकडून शिंदेंना ऑफर…
गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्याकडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली. मात्र, गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती सोडण्यास भाजप तयार आहे. तर, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला अर्थ, महिला आणि बाल विकास, अल्पसंख्याक, मदत आणि पुनर्वसन, वैद्यकीय शिक्षण, आदिवासी विकास ,अन्न आणि नागरी पुरवठा ही खाती भाजप सोडण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.