
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या चार दिवसांपासून आजारी आहेत. परंतु प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी ते मंगळवारी दुपारी ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले आहेत.
डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांचा ताप कमी-जास्त होत आहे. त्यामुळे अंगामध्ये कणकण आहे. घशातही इन्फेक्शन असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या काही तपासण्या केल्या. डेंग्यू आणि मलेरियाच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या पेशी कमी जास्त होत असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना थेट रुग्णालयातच दाखल होण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शिंदे रुग्णालयात दाखल झाले आहेत. ज्युपिटर रुग्णालयात शिंदेंवर उपचार सुरु आहेत.
महायुती सरकारचा ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ नेते येणार आहेत. मात्र त्यापूर्वीच एकनाथ शिंदेची प्रकृती खालावल्याने ते या सोहळ्याला उपस्थित राहतात की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे नाराज?
उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद मिळावं, यासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्याचं बोललं जातंय. शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट यांनीही गृहमंत्री पद देण्याबाबत जाहीर भाष्य केलं आहे. याच कारणामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.
गृहमंत्री पदासोबतच नगरविकास मंत्रिपद आणि विधानसभेचे अध्यक्षपद मिळावं, अशी शिवसेनेची मागणी असल्याचं सुरुवातीपासूनच सांगितलं जातं. परंतु भाजपने ही मागणी फेटाळल्याचं कळतंय. त्यामुळे शिंदेंच्या वाट्याला नेमकं काय येणार, हे ५ तारखेला कळेल.
त्यातच आता एकनाथ शिंदे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. ते शपथविधी सोहळ्याला हजर राहतात की नाही, हा प्रश्नच आहे. त्यांच्याशिवाय भाजपला शपथविधी करावा लागणार आहे. शिंदेंची नाराजी भाजपला परवडणारी आहे की नाही, हे येणारा काळच सांगेन.