
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळून देखील महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा मागील काही दिवसांपासून सुरू होता. आता, हा तिढा सुटला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दुसरीकडे महायुतीमधील धुसफूस कायम आहे.
भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या काही मंत्र्यावर आक्षेप घेतले. त्यामुळे त्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान नको, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. भाजपच्या पवित्र्यावर शिवसेना शिंदे गटाने संताप व्यक्त केला आहे. आमचे मंत्रीदेखील भाजप कसं काय ठरवणार, असा संतप्त सवाल शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उपस्थित केला.
शिवसेना नेत्यांचा संताप…
महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. यावेळी नव्या मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांच्या नावांवरून कोंडी झाली असल्याचे चित्र आहे. महायुती सरकारच्या ‘मंत्रिमंडळात कलंकित चेहरे नको’ अशी भूमिका भाजपने घेतली आहे. मंगळवारी, रात्री उदय सामंत यांच्याकडून शिवसेना मंत्र्यांच्या नावाची यादी भाजपला देण्यात आली. यानंतर शिवसेनेच्या काही मंत्र्यांच्या शपथ घेण्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर आक्षेप घेतल्यानंतर शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमचेही मंत्री तुम्हीच ठरवणार का? असे म्हणत शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपचा शिवसेनेच्या कोणत्या नावांना विरोध?
भाजपने संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांच्या नावावर आक्षेप घेतला आहे. याचा निरोप मंगळवारी गिरीश महाजनांमार्फत शिंदे यांना पोहोचवण्यात आला. त्यानंतर सायंकाळी स्वत: देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर गेले. जवळपास 6 दिवसानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रत्यक्ष भेट आणि चर्चा झाली.
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना होती आग्रही….
महायुती सरकारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आपला कोणताही अडथळा होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचा निर्णय हा अंतिम राहिल असे काळाजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यानंतर 28 नोव्हेंबर रोजी ही बैठक झाली होती. विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळवला. शिंदे यांच्या शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागांवर विजय मिळवला. विधानसभा निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य करण्यात येत होते.