
राज्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु मंत्र्यांना अजूनही खातेवाटप करण्यात आलेले नाही. अशातच आज विधान परिषदेच्या सभापती पदी भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
तर विधानसभेचे अध्यक्ष पदही भाजपकडे असून राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मागच्या सरकारच्या काळात विधानसभेचे उपाध्यक्ष पद राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे यंदाही त्यांच्याकडेच उपाध्यक्ष पद देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडी सरकार असतांना विधानसभेचे उपाध्यक्ष पद हे नरहरी झिरवाळ यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानंतर महायुतीचे सरकारच्या वेळीही नरहरी झिरवळच उपाध्यक्ष राहिलेत. त्यामुळे यावेळीही उपाध्यक्ष पद अजित पवार गटाकडे राहणार आहे. यासाठी महायुती सरकार दलित चेहरा देणार असल्याचे समजत आहे. यासाठी राजकुमार बडोले, अण्णा बनसोडे, संजय बनसोडे यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे.
दरम्यान, गेले अनेक महिने रिक्त असलेले विधान परिषदेच्या सभापती पदी आता राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. त्याआधी विधान परिषदेचा कारभार शिवसेना शिंदे गटाच्या आमदार नीलम गोऱ्हे संभाळत होत्या. अशातच सभापती पद शिवसेना शिंदे गटालाच देण्यात यावा, असा आग्रह होता. परंतु भाजपने शिंदेंकडे हा कारभार दिला आहे. तर विधान परिषदेचे उपाध्यक्ष पद हे निलम गोऱ्हे यांच्याकडे राहणार असल्याचे समजत आहे.