
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन मंत्र्यांचे खातेवाटपही पूर्ण झाले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मोठे विधान केले आहे.
अजित पवार यांच्याबाबतच्या काही गोष्टी तपासाव्या लागतील आणि त्यानंतर त्यांच्याबरोबर जाईन, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.
राष्ट्रावादीचे आमदार अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आले. यावर जानकर म्हणाले, चर्चा या चर्चा राहतात. लोक अजित पवार यांना काही कामानिमित्त भेटायला जात असतील. उत्तम जानकरला सामावून घेण्याइतके अजित पवार यांचे नेतृत्व मोठे आहे का, हे मला पहिल्यांदा तपासावे लागेल. तेवढे मोठे नेतृत्व असेल तर मी अजित दादांबरोबर जाईन. त्यासाठी अजित दादांची कपॅसिटी पहिल्यांदा तपासावी लागेल.
उद्धव ठाकरे पाच जानेवारीला मारकडवाडीला येणार आहेत. तर १० तारखेला किंवा एक दिवस मागे-पुढे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे मारकडवाडीला येणाचे नियोजन सुरू आहे. यावेळी त्यांच्याबरोबर प्रियांका गांधीही येण्याचा प्रयत्न करणार आहेत. हे लोक इथे गावाने बंड का केले हे जाणून घेण्यासाठी आणि इथे काय झाले हे पाहण्यासाठी येणार आहेत, असंही उत्तम जानकर म्हणाले.