लोकसभेला 80 स्ट्राईक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ( शरदचंद्र पवार ) विधानसभेला केवळ 10 जागांवर विजय मिळवता आला आहे. महाविकास आघाडीचं सरकार येईल, अशी अपेक्षा असलेल्या आमदार आणि खासदारांचा भ्रमनिरास झाला.
त्यामुळे पुन्हा पाच वर्षांसाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यानं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आमदार, खासदार प्रचंड अस्वस्थ असल्याचं समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची ( शरदचंद्र पवार ) 8,9 जानेवारीला बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तेसोबत जाण्याचा निर्णय पक्षानं घ्यावा, यासाठी आग्रही भूमिका मांडण्याचं नियोजन आमदार, खासदारांनी केले आहे. आपला पक्ष अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन करा आणि एकाच जोमाने पक्ष वाढवा, अशी त्यांची भूमिका आहे. पण, शरद पवार, सुप्रिया सुळे काय भूमिका घेतात? यावर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. एका मराठी वृत्तपत्रानं हे वृत्त दिलं आहे.
महाविकास आघाडीची अडीच वर्षे सोडता राष्ट्रवादी 2014 पासून सत्तेत नाही. आता पुन्हा सत्तेबाहेर असल्यानं पुढील 5 वर्षे मतदारसंघातील विकासकामे कसे करणार? पुढील निवडणुकीला कसे सामोरे जाणार? हा प्रश्न नेत्यांना पडला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र याव्यात आणि संघटन मजबूत करून पुढे जावे, असं अनेक आमदार, खासदारांचं मत आहे.
तीन नेत्यांचा विरोध…
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील आणि उत्तम जानकर या तिघांनी आमदार, खासदारांच्या प्रस्तावास विरोध केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्त्व काय ठेवावे. विरोधी पक्षाची भूमिका बजावावी, असं त्यांना वाटतं.
शरद पवार संघटनेपासून दूर होणार?
सत्तेसोबत जाण्यासाठी शरद पवार यांच्या कुटुंबीतील एका लोकप्रतिनिधीचा आग्रह सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. सुप्रिया सुळे यांनी सत्तेसोबत जाण्यासाठी अनुकूलात दाखली, तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. आमदार, खासदारांचा बहुमतानं सत्तेसोबत जाण्याचा निर्णय झाला, तर शरद पवार संघटनेपासून दूर होण्याचा निर्णय घेऊ शकतात, असेही सूत्रांनी सांगितलं आहे.
