
रुपाली चाकणकर यांची हाकलपट्टी करण्याची मागणी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत आहे. रुपालीताईंना अभिनेत्री प्राजक्ता माळींना न्याय द्यायला वेळ आहे. पण, दलित महिलांना न्याय देण्यासााठी पुढाकार घेण्यास वेळ नाही.
त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भीम आर्मीने केली आहे.
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या हत्येमागील मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना अभिनेत्री प्राजक्ता माळींचे परळीतील कार्यक्रमाच्या अनुषंगाने नाव घेतले होते. त्यावर आक्षेप घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने धस यांच्याकडे बदनामी केल्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी केली. तर, महिला आयोगाकडेही तक्रार केली होती. त्यावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलिसांना पुढील कारवाईचे निर्देश दिले.
रुपाली चाकणकर जातीयवादी, हकालपट्टी करा…
भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांनी रुपाली चाकणकर या जातीयवादी असल्याचा आरोप केला. परभणीमध्ये पोलिसांनी कोम्बिंग ऑपेरेशन करून मागासवर्गीय महिलांवर हल्ला केला. त्याच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. त्याचा विनयभंग केला. परंतु आजपर्यंत रुपालीताई चाकणकार यांना या मागासवर्गीय महिलांना न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यावा वाटला नसल्याची टीका कांबळे यांनी केली.
रुपालीताई चाकणकर या प्रचंड जातीयवादी आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लवकरात लवकर रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील कांबळे यांनी केली आहे. चाकणकर यांची हकालपट्टी न केल्यास मुंबईतील महिला आयोगाच्या कार्यालयाबाहेर भीम आर्मीच्या माध्यमातून आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.