
आमदार सुरेश धस यांना बावनकुळेंची तंबी
माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी सरकारशी चर्चा करा,अशी तंबी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार सुरेश धस यांना दिली आहे.
आमदारांनी सरकार काय कारवाई करत आहे, हे आधी तपासून घ्यावे. माध्यमांमध्ये बोलण्यापूर्वी सरकारशी बोलले तर चांगले मार्ग निघू शकतात, असे ते म्हणाले.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार धस आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला आहे. वाल्मिक कराड सरेंडर झाल्याबद्दल संशय व्यक्त केला आहे. यावर बावनकुळे म्हणाले,एखादा आरोपी शरण येत असेल आणि तपास पुढे जाणार असेल टिका करुन काही उपयोग नाही. मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे की बीड प्रकरणातील कुठलाही आरोपी सुटणार नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यादीत पहिल्या दहा मध्ये ही नाहीत!
मस्साजोग गावात ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.यावर बावनकुळे म्हणाले, ग्रामस्थांना विनंती करेल की सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवावा. गावकऱ्यांनी तपास यंत्रणेला साथ द्यावी.
बावनकुळे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावर ते म्हणाले, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना आई महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी निमंत्रण दिले. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवाव्यात यासाठी मार्गदर्शन केले. जनतेच्या मागण्या आम्ही पूर्ण करु. महाराष्ट्राला केंद्राचं मोठं पाठबळ आहे.