
देवाभाऊ बॅकसीटवर, बीडच्या पालकमंत्रीपदी अजितदादाच का?
बीडच्या पालकमंत्री कोण असणार, याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू होती. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होऊ लागले.
त्यामुळे धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पद देण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येत होती. बीडच्या पालकमंत्री पदाच्या शर्यतीमधून धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाला. तर, दुसरीकडे पंकजा मुंडे यांनाही संधी देण्यात आली नाही. मात्र, बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्रे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात गेली.
धनंजय मुंडे यांचा पत्ता कट…
राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख प्रकरण भोवलं आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे म्हटले जात होते. वाल्मिक कराड जवळपास 22 दिवस फरार होता. अखेर त्याने खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडी समोर शरणागती पत्करली.
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराड याचे निकटवर्तीय असून त्याच्या इशाऱ्याने हत्या झाली असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत होता. बीडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्येही जवळपास सगळ्याच वक्त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका करताना त्यांच्या पालकमंत्री पदाला विरोध केला.
धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड हेच कार्यकारी पालकमंत्री असल्याचे सांगण्यात येत होते. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीच्या गुन्ह्यात सध्या ते सीआयडी कोठडीत आहेत. धनंजय मुंडे हे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड यांनी आपल्या वर्चस्वात वाढ केली होती, असा मुद्दाही वारंवार अधोरेखित केला जात होता. संतोष देशमुख प्रकरणाचा फटका धनंजय मुंडे यांना बसला असल्याचे म्हटले जात आहे.
पंकजा मुंडे यांना संधी का नाही?
भाजप नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांनीदेखील आपण पालकमंत्री पदासाठी उत्सुक नसल्याचे संकेत दिले होते, असे सूत्रांनी म्हटले. बीड मधील कायदा-सुव्यवस्था सध्या चर्चेत आहे. धनंजय मुंडेंच्या अपयशाचे धनी होऊन टीकेचे खापर आपल्यावर फोडण्यासाठी पंकजा उत्सुक नसल्याचे सांगण्यात येत होते. पंकजा मुंडे या 5 वर्षांच्या कालावधीनंतर मंत्रिमंडळात आल्या आहेत. त्यामुळे ही नवी इनिंग वादात न अडकवता योग्य पद्धतीने पुढे घेऊन जाण्याकडे पंकजा यांचा कल असल्याचीदेखील चर्चा आहे.
पालकमंत्री पदी अजितदादाच का?
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीडचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजितदादांची नियुक्ती करताना स्थानिक राजकारण, सामाजिक समीकरणावरही भर दिला गेला असल्याचे म्हटले जात आहे. बीड जिल्ह्यातील राजकीय-सामाजिक घटकांबाबत अजित पवारांना चांगली माहिती आहे. त्यामुळे बीडमधील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी अजितदादांकडून चांगल्या प्रकारे प्रयत्न होतील असाही कयास आहे.
तर, दुसरीकडे बीडमध्ये सध्या दोन समाजातील सामाजिक वीण उसवली असल्याचे म्हटले जात आहे. त्याला छेद देण्यासाठी आणि सामाजिक सलोख्यासाठी अजित पवारांकडेच सूत्रे आली असावी असाही एक मतप्रवाह आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीच्या कोट्यातील आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत एवढ्या कठीण परिस्थितीत जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अजित पवारांशिवाय दुसरा पर्याय पक्षात नसल्याचेही म्हटले जात आहे.