
अखेर मावस भावानेच तोंड उघडलं
बीड :राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठा गदारोळ झाला. पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. आरोपी विष्णू चाटे याने वाल्मीक कराडने खंडणीसाठी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची कबुली दिली आहे
संतोष देशमुख यांचे अपहरण व हत्या प्रकरणासह पवनऊर्जा कंपनीकडून तब्बल 2 कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. तिथे त्याची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीत त्याने वाल्मीक कराडने आपल्या फोनवरून पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसंदर्भात बोलणी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा खुलासा झाला आहे.
विष्णू चाटेनी काय कबुली दिली?
वाल्मिक कराडने पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केले होते. वाल्मिक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटींची खंडणी मागितली होती. यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला होता. विष्णू चाटे याने स्वत: वाल्मिक कराड यांना फोन लावून पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करुन दिल्याची कबुली दिली आहे. CID च्या रिमांड कॉपीमध्ये तसा उल्लेख आहे.
आरोपी विष्णू चाटे कोण आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे हा केज तालुक्यातील कवडगावचे पूर्वी सरपंच होता. विष्णू चाटे हा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या केज तालुकाच्या अध्यक्ष होता. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याला सह आरोपी करण्यात आल्यानंतर त्याला पक्षातून निलंबित करण्यात आले. विष्णू चाटे हा देखील धनंजय मुंडे यांचा समर्थक असल्याचे बोलले जात आहे. वाल्मिक कराडसोबतही त्याचे निकटचे संबंध असल्याचे बोलले जात आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी अमानुषपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर 10 व्या दिवशी पोलिसांना विष्णू चाटेला पकडण्यात यश आले होते.