संतोष देशमुख हत्याकांडाच्या निमित्ताने बीडचे पीआय हेमंत कदम यांचीही चौकशी व्हावी, कारण याच अधिकाऱ्याने परळीत अनेक खोटे गुन्हे दाखल करून उच्छाद मांडला होता, असा आरोप शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी सीएम फडणवीस हेच त्यांना वाचवत असल्याने मला नाही वाटत की ते नैतिकतेला घरून राजीनामा देतील. तसंच हे देशमुख हत्याकांड खंडणीच्या वादातूनच झालं असल्याचे तपासात समोर आलं आहे. सगळ्या गोष्टी समोर असतानाही काही जातीय पुढारी त्याच्या आडून बीडमधील जातीय संघर्ष पेटवू पाहत असतील हे दुर्दैवी आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
बीड परळीला बदनाम करू नका : सुषमा अंधारे
सुषमा अंधारे म्हणाल्या, गुन्हेगाराला कोणतीही जातपात नसते. बीडसोबतच परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींनाही न्याय मिळाली पाहिजे. बीड परळीला बदनाम करू नका.
वाल्मिक कराडने स्वत: हून पुण्यात सीआयडीसमोर सरेंडर
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणी वाल्मिक कराड तुरुंगात आहे. देशमुखांची हत्या करणारे आरोपी कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे कराडच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. सीआयडीने वाल्मिक कराडचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याची बँक खाती गोठवण्यात आली. तर, संपत्ती जप्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अखेर वाल्मिक कराडने स्वत: हून पुण्यात सीआयडी समोर सरेंडर केले.
हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार…
संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत. या तिन्ही आरोपींचा शोध सुरू आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार आहेत. ल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे. आता या प्रकरणातील खंडणीचा गुन्हा दाखल असलेला वाल्मिक कराड हा सीआयडीसमोर शरण आला. त्यानंतर आता या मुख्य आरोपींचा शोध सुरू झाला आहे. या प्रकरणातील मुख्य तीन आरोपींना पोलिसांनी मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित केले आहे.
