वाल्मिकच्या कोठडीपर्यंत जाणाऱ्या तांदळेंची भलतीच मागणी
खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड १५ दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये आहे. पोलीस कोठडीत असताना एक व्यक्ती थेट कराडच्या कोठडीपर्यंत पोहोचला होता. या प्रकाराबद्दल मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी तक्रार केली होती.
पण आता ज्या व्यक्तीबद्दल देशमुखांना तक्रार केली होती, तो माणूस समोर आला आहे. ‘जर मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा आणि जर नसेल तर धनंजय देशमुखांवर कारवाई करा, अशी मागणीच बालाजी तांदळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मयत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तक्रार करत ज्या बालाजी तांदळेंवर आरोप केले होते, त्या बालाजी तांदळेंनी आता या प्रकरणाची चौकशी करावी म्हणून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच विनंती केली आहे.
“मी सीआयडीच्या बोलण्यावरून बीड शहर पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्या ठिकाणी मी बाथरूमला चाललो होतो. यादरम्यान धनंजय देशमुख म्हणाले की, तू इथे कसा ? यावर मी त्यांना सांगितलं की, मला सीआयडीने फोन करून बोलावलं आहे. आणि मी माझ्या मोबाईलमधील सीआयडीने फोन केलेला नंबर धनंजय देशमुख यांना दाखवला’ असा दावा तांदळेंनी केला.
मात्र, ‘त्यांनी जो माझ्यावर आरोप केलाय, तो पूर्णपणे खोटा आहे. बीड शहर पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही आहेत, त्या सीसीटीव्हीची तपासणी करावी, जर या तपासणीमध्ये मी जर दोषी आढळलो, तर माझ्यावर कारवाई करावी, अन्यथा माझ्यावर खोटा आरोप करणाऱ्या धनंजय देशमुखवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी विनंती देखील यावेळी तांदळे यांनी आपल्यावर झालेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना केली आहे.
धनंजय देशमुख यांनी काय केली तक्रार?
खंडणी प्रकरणी आरोपी असलेले वाल्मिक कराडला भेटण्यासाठी कोरेगावचे माजी सरपंच पती बालाजी तांदळे हे आले आणि थेट पोलीस ठाण्यात गेले होते. मला विचारले तू इथे काय करायला, सीआयडीवाले कुठे आहेत आणि वाल्मिक कराडला ठेवण्यात आलेल्या कोठडीकडे गेले. दोन मिनिटात परत आल्यावर मी म्हटलं, तुम्ही त्या सहा तारखेच्या दिवशी पवनचक्की वादाच्या ठिकाणी होतात.
आम्हाला म्हटलास आरोपी मीच पकडले आणि माझ्या भावाची हत्या करणाऱ्या सुदर्शन घुले यांचा फोटो दाखवला आणि आरेरावी केली आणि संतापजनक माझ्याशी वागला. आम्ही सदरील घटना पोलीस महिला कर्मचारी रेडेकर यांना सांगितली तर त्यांनी हुजत घातली आणि आपण सीआयडीसोबत आलो आहोत, असं सांगितलं, असं धनंजय देशमुख यांनी तक्रारीत म्हटलंय.
दरम्यान, दंगल पथकातील कर्मचारींनी आपण सीआयडीचा वाहन चालक असल्याचं म्हटलंय. रेडेकर यांच्याशी हुज्जत घालणारे बालाजी तांदळे यांच्यावर कार्यवाही करण्याचा विषय काढताच त्या ठिकाणी असलेले एपीआय दराडे यांनी आवाज कमी करून बोला असं उलट रेडेकर यांनाच बोलले, तांदळे यांना बाजूच्या रूममध्ये बसवून नंतर सोडून दिलं. मेहरबान साहेब, माझी आपल्याकडे तक्रार आहे की, ज्या ठिकाणी आरोपी आहेत अश्या ठिकाणी असे लोक येतात कसे, खून करणारे मुख्य आरोपी अद्याप सापडले नाहीत आणि मला त्या घुले नामक आरोपीचा फोटो दाखवणे म्हणजे मला दहशती खाली घेत होता, अशी माझी तक्रार आहे. अश्या लोकांच्या थेट कोठडीपर्यंत येण्याने माझ्या भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? तपास कामाला प्रभावित करण्याचा हा प्रकार तर नसावा, अशी शंका धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
