
अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंनी दिली हिंट..?
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळचे असलेल्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसंच धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पदही देऊ नये, अशी मागणी केली जात आहे.
भाजप आमदार सुरेश धस यांच्यासोबत विरोधी पक्षानेही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच धनंजय मुंडेंनी सूचक पोस्ट केली आहे, त्यामुळे या पोस्टमधून धनंजय मुंडेंना नेमका काय इशारा द्यायचा आहे? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी धान्य वितरणाच्या अनुषंगाने पुरवठा विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीचे फोटो धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच आपल्या खात्याची बैठक घेऊन धनंजय मुंडे यांनी विरोधकांना दिलेल्या हिंटच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
अजितदादा बीडचे पालकमंत्री?
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री पद देण्यास जोरदार विरोध होत आहे. अशा परिस्थितीत महायुतीच्या मुख्य नेत्यांनी बीडचं पालकत्व घ्यावं अशी मागणी विरोधकांसह स्थानिक सत्ताधारी आमदारांकडून होत आहे, त्यामुळे महायुतीने सेफ गेम खेळण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. बीडचं पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री अजित पवारांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे, तर धनंजय मुंडे यांना धाराशिव जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे.