
गँगस्टर घायवळसोबत सुरेश धसांचा फोटो समोर…
बीडमधील खंडणीखोरी, गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करताना धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस हे देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळसोबतचे सुरेश धस यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.
या गँगस्टर घायवळचा बीडमधील पवनचक्की खंडणी प्रकरणाशी संबंध आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
गुंड निलेश घायवळचे आमदार धसांसोबतचे फोटो व्हायरल झालेत. रविवारी पुण्यात सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचा पदाधिकारी नितीन बिक्कडवर आरोप केले होते. नितीन बिक्कड हा बीडमधील पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून खंडणीसाठीची डील, मध्यस्थी करत असल्याचा आरोप सुरेश धस यांनी पुण्यातील जनआक्रोश मोर्चामध्ये केला होता.
घायवळकडून बिक्कडला धमकी?
नितीन बिक्कड हा पवनचक्की ठेकेदार आहे. याच नितीन बिक्कडला घायवळ गँगने धमकी दिली होती. या धमकीची एफआयआर प्रत न्यूज 18 लोकमतकडे आहे.आता घायवळ गँगने नितीन बिक्कड याला धमकी का दिली होती, याची चर्चा सुरू झाली आहे. पवनचक्की उभारण्याच्या कामाच्या कंत्राटातून की आणखी कोणत्या मुद्यांवरुन घायवळ गँगने बिक्कड याला धमकी दिली होती का, याचीही चर्चा रंगली आहे.
हेच काय ते पुणे कनेक्शन?
बीड जिल्ह्यात पवनचक्की प्रोटेक्शन खंडणीवरूनच संतोष देशमुख हत्याकांड घडल्याचा आरोप आहे. भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या पाटोदा तालुक्यातच सर्वाधिक पवनचक्क्या आहेत. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून बीड पवनचक्की खंडणीचं पुणे कनेक्शन असल्याचा आरोप होत आहे. आता पुणे कनेक्शन नेमकं हेच तर नाही ना अशी चर्चा रंगलीय. गँगस्टर घायवळ हा पुण्यात असला तरी तो मूळचा जामखेडचा आहे. त्यामुळे आता बीडच्या खंडणीच्या प्रकरणाला वेगळं वळण लागणार आहे का, याची चर्चा रंगली आहे.
सुरेश धस यांनी काय म्हटले होते?
पुण्यातील सभेत बोलताना सुरेश धस यांनी सांगितले की, 14 जून 2024 रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची धनंजय मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. त्यानंतर 19 जून 2o24 रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत नितीन बिक्कड, वाल्मिक कराड, अनंत काळकुटे, अल्ताफ तांबोळी, अवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला हे उपस्थित होते. त्यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 3 कोटी ऐवजी 2 कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानंतर निवडणूक काळात कंपनीकडून 50 लाख रुपये घेतले, असा आरोपही धस यांनी केला होता.