
तटकरेंची पवारांच्या खासदारांना ऑफर, सुळेंनी पटलेंना झापलं ?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अजित पवार गटाकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार गटातील खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटातील सातही खासदारांना संपर्क करून सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सात खासदारांची भेट घेऊन त्यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. मात्र सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारली असून त्यांनी हा सर्व प्रकार खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितले आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट प्रफुल्ल पटेल यांना फोन करून तुम्ही अजूनही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का ? असा सवाल केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सुनिल तटकरे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना वगळून उर्रवित खासदारांना सत्तेत येण्याची ऑफर दिली. याचसोबत याची बाहेर कुठेही वाच्यता करू नका, असेही सांगितले. मात्र या सर्व खासदारांनी ऑफर नाकारत सर्व हकिकत सुप्रिया सुळे यांना सांगितली. यावेळी तुम्ही पुन्हा एकदा आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का ? अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना केली.
या संपुर्ण प्रकरणाबाबत खासदार निलेश लंके यांना विचारले असता, ते म्हणाले की, सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो, बोलतो. मात्र राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही. राजकारणात कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं. घाबरून निर्णय बदलायचा नसतो. सत्ता आल्यास सत्ता भोगायची अन् सत्ता नसल्याच लढायची तयारी ठेवायची असेही निलेश लंके म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांच्या पक्षाचे खासदार फुटत नाहीत तोपर्यंत अजित पवारांच्या गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार नाही. हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे. पटेल यांना सांगितलं गेले आहे की खासदारांचा कोटा पूर्ण करा. शरद पवारांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडले की तुम्हाला मंत्रिपद मिळेल. देशाला त्याचा काहीही उपयोग नाही. पटेल, तटकरेंना केंद्रात मंत्री व्हायचं आहे. त्यामुळे फोडाफोडीचा नीच आणि निर्ल्लज प्रकार सुरू आहे. ईव्हीएमच्या माध्यमातून महाराष्ट्र विधानसभा तुम्ही जिंकला आहात, तरीही तुमची फोडाफोडीची भूक भागत नाही. कार्यकर्ते, आमदार, खासदार फोडाफोडी सुरू आहे. देशाचं भाग्य तुम्ही काळ्या शाईने लिहिणं चालवलं आहे. असेही ते म्हणाले.