
‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा संताप
महंत रामगिरी महाराज यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या जनगणमन वर आक्षेप घेतला आहे. देशाचं राष्ट्रगीत जनगणमन नव्हे तर वंदे मातरम् असायला हवं, अशा आशयाचं वक्तव्य रामगिरी महाराजांनी केलं आहे.
रामगिरी महाराजांच्या या वक्तव्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. रामगिरींच्या या वक्तव्याचा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही समाचार घेतला आहे. रामगिरी महाराजाला आता जोड्यानं मारायची वेळ आली आहे, अशा शब्दांत आव्हाडांनी रामगिरी महाराजांचा समाचार घेतला आहे.
रामगिरी महाराजांनी जनगणमन बाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारला असता आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “आता रामगिरी महाराजाला जोड्यानं मारायची वेळ आलीय. त्याचा आता जनगणमनवरही आक्षेप आहे का? त्याचा जनगणमनवर आक्षेप असेल तर त्याने त्यावर बॅन करण्याची मागणी करावी”, असं वक्तव्य आव्हाडांनी केलं. तसेच आता रामगिरीचं अती व्हायला लागलंय, असंही ते म्हणाले. आव्हाडांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
रामगिरी महाराजांनी नुकतंच छत्रपती संभाजीनगरमध्ये अयोध्या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. यावेळी चित्रपटगृहात सुरु लावलेल्या राष्ट्रगितावर त्यांनी आक्षेप घेतला. यावेळी ते म्हणाले, “प्रत्येक चित्रपटाच्या सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवलं जातं. तसं इथेही वाजवलं गेलं. मात्र, हे गीत रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली कोलकाता येथे जॉर्ज पंचम यांच्यासमोर गायल आहे. ते राष्ट्राला संबोधून गायलं नव्हतं तर ते जॉर्ज पंचमची स्तुती करण्यासाठी गायलं होतं. त्यामुळे हे गीत राष्ट्राला समर्पित नाही. त्यामुळे वंदे मातरम हेच खऱ्या अर्थानं आपंलं राष्ट्रगीत आहे.
रामगिरी महाराज पुढे म्हणाले, कदाचित माझ्या शब्दावर लोक आक्षेप घेतील. मात्र, जॉर्ज पंचमची यांची स्तुती करण्यासाठी टागोर यांनी हे गीत गायलं आहे. या गीतातून त्यांनी पंचम यांना तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात, असं म्हटलं आहे. रवींद्रनाथ टागोर यांचं शिक्षणक्षेत्रात मोठं कार्य आहे. पण सध्या ज्याप्रमाणे शिक्षण संस्था चावणाऱ्या लोकांना राजकीय लोकांशी समतोल राखावा लागतो. तसाच संबंध टागोरांनी ब्रिटीशांशी ठेवला होता. त्यांनी ब्रिटीशांची स्तुती केल्याने त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला जात असल्याचं वक्तव्यही रामगिरी महाराजांनी यावेळी केलं. या वक्तव्यावर आता जितेंद्र आव्हाडांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.