
745 शिक्षकांचं नेमकं काय प्रकरण?
भाजप आमदार सुरेश धस यांच्या टार्गेटवर आता त्यांच्या पक्षाच्या नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील साडेसातशे शिक्षक चुकीच्या जागेवर बसवल्याचा आरोप धस यांनी केलाय.
त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय.
सुरेश धस यांनी आता त्यांचा मोर्चा पंकजा मुंडेंकडे वळवलाय. पंकजा मुंडे आणि सुरेश धस एकाच पक्षात आहेत. असं असतानाही धस यांनी पंकजा मुंडेंवर तोफ डागली. या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडेंच्या विरोधात भूमिका घेतली होती. मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मी नाही तर त्यांच्याच पक्षाचे प्रकाश सोळंके यांनी केली होती, असा यू टर्न घेतल्यानंतर सुरेश धसांनी आता पंकजा मुंडेंवर निशाणा साधला.
बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत सुरेश धस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना सुरेश धस यांनी मोठा धमाकाच केला. पंकजा मुंडे यांनी ७४५ शिक्षकांची चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, असा आरोप सुरेश धस यांनी केला. आपल्याच पक्षाचा आमदार आपल्याच पक्षाच्या मंत्र्यावर आरोप करत असल्यामुळे भाजप काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
कोणत्याही कार्यकारी मंडळाला कर्मचारी भरतीचे अधिकार नसताना 2008 पासून 2021 पर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. ती नियमबाह्य असून सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती.
आमदार सुरेश धस महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांवर तोफ डागत आहेत. इतकंच नव्हे तर आमदार सुरेश धसांनी आता त्यांच्याच पक्षाच्या पंकजा मुंडेंवरही आरोप सुरू केलेत. आता सुरेश धसांचे आरोप सुरूच राहणार की, पुन्हा यू टर्न घेणार? हे आता लवकरच स्पष्ट होईल.
राष्ट्रवादीचं ठरलं, सुरेश धस यांच्या आरोपांची धार कमी करा
आपल्याच मित्रपक्षातील नेत्यावर आणि महत्त्वाचे म्हणजे सरकारमधील मंत्र्यावर आरोपांची राळ उडवल्यानंतरही आमदार सुरेश धस यांना पक्षनेतृत्व काही बोलत नसेल तर सुरू असलेल्या प्रकरणाला संबंधित पक्षाची मूकसंमतीच आहे, असे गृहित धरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने संपूर्ण ताकदीने धस यांच्यावरही तुटून पडण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना, मंत्री आणि प्रवक्त्यांना दिल्याचे कळते. अजित पवार यांच्या सूचनानंतरच मंत्री दत्ता भरणे आणि हसन मुश्रीफ यांनी धनंजय मुंडे यांचा बचाव करताना जोरदार किल्ला लढवला. मंत्रीमहोदयांच्या पुढे एक पाऊल टाकून प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तर सुरेश धस यांचे कथित जमीन घोटाळे, खून प्रकरणे आणि दरोड्यातील आरोपींच्या धस यांच्या संबंधांना हात घालत जशास तसे उत्तर देण्याचे संकेत दिले.