
CIDकडून मोठी कारवाई
बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाला एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे.
मात्र अजूनही कृष्णा आंधळे नावाचा आरोपी फरार आहे. पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असली तरी संतोष देशमुख यांची हत्या कुणाच्या सांगण्यावरून केली, या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड कोण आहे? हे अद्याप समोर आलं नाही.
संतोष देशमुख यांच्या हत्येचं गूढ उलगडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी सीआयडीने वाल्मिक कराडवर मोठी कारवाई केली आहे. सीआयडीने वाल्मिक कराडचे तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. यातून संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वाल्मिक कराडचे तिन्ही फोन आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जाणार आहेत. तसेच त्याच्या आवाजाचे नमुनेही तपासले जाणार आहेत.
सीआयडीने ही सगळी कारवाई 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात केली आहे. सीआयडीने वाल्मिक कराडचे 3 मोबाइल जप्त केले आहेत. मात्र अद्याप विष्णू चाटेचा मोबाइल तपास पथकाला मिळालेला नाही. त्यामुळे विष्णू चाटेच्या घराची झडती घेवून सर्च मोहीम राबवण्यात येणार आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने तपासले जात आहेत.
सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर २ कोटींच्या खंडणीचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर गुन्हा नोंद आहे. कराडचे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विष्णू चाटे याने स्वतःच्या मोबाइलवरून बोलणे करून दिले होते. चाटेचा मोबाइल अद्यापही सीआयडीला मिळालेला नाही, तर कराडने आपले ३ मोबाइल सीआयडीकडे सोपवले आहेत. मोबाइल जप्त करण्यात आले असून या ३ मोबाइलची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. मोबाइलवरील संवादाचा आवाज कराड याचाच आहे का? याची पडताळणी केली जाणार आहे.