
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे.
सीआयडीच्या हाती वाल्मिक कराडविरोधातील महत्त्वाचा पुरावा हाती लागला आहे.
मागील वर्षी 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली. ठिकठिकाणी आक्रोश मोर्चेही काढण्यात आलेत. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक केली असून एक जण अद्यापही फरार आहे. सीआयडी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास 150 हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली. तपासाच्या दरम्यान काही महत्त्वाचे धागेदोरेही लागले आहेत.
सीआयडीला काय सापडलं?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा महत्त्वाचा ठरणार आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने विष्णू चाटे यांच्या मोबाईल वरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटीची खंडणी मागितली होती. सीआयडीच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग आणि कॉल डिटेल्स हाती लागले आहेत. यासंदर्भात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाची तपासणी करणे सुरू आहे. कराड याने विष्णू चाटेच्या मोबाइलवरून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली. मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती. याच संदर्भात सुनील केदू शिंदे यांच्या तक्रारीवरून केज पोलिसांना गुन्हा दाखल आहे. सुनील शिंदे हे आवदा एनर्जी कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम करत आहेत. केज तालुक्यात विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीच्या कामाची जबाबदारी आहे.
फोनवरून काय धमकी दिली?
29 नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे याने फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत, असे त्याने सुनील शिंदे यांना सांगितले. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे. त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा’, असे म्हणून काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी घुले कार्यालयात आला. ‘काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू’, अशी धमकी दिली. ‘काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या’, असे सांगितले होते. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदे यांच्या मोबाइलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागले आहे. आता सीआयडीकडून आवाजाच्या नमुन्याची तपासणी होणार आहे.