
धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, मनोज जरांगे का आक्रमक झाले?
आरोपींची बाजू घेऊन काढण्यात येणारे प्रतिमोर्चे थांबवा नाहीतर महाराष्ट्रात असाच पायंडा पडेल, अशी भीती व्यक्त करून संतोषभैय्याचा खून करून पोट भरलं नाही का? असा सवाल करीत धनंजय मुंडे माझ्या नादी लागू नको, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
महाराष्ट्रासारख्या राज्यात आरोपींना समर्थन द्यायला मोर्चे काढावेत?
निर्घृण हत्या झाल्यानंतर आरोपींची बाजू घेऊन समर्थनार्थ मोर्चे काढायचे, हा पायंडा साफ चुकीचा आहे. उद्या असे खून झाले आणि असेच मोर्चे निघायला लागले, तर महाराष्ट्राला आपण काय सांगू पाहतोय? महाराष्ट्रासारख्या राज्यात आरोपींना समर्थन द्यायला मोर्चे काढावेत? हे साफ चुकीचे असल्याचे जरांगे म्हणाले.
मोर्चानंतर जरांगे पाटील उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल
जालना येथे मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा होता. या मोर्च्यात मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खखालावल्याने आणि थकवा जाणवत असल्याने त्यांनी भाषण टाळले. मोर्चानंतर त्यांना उपचारासाठी गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रदीप चावरे यांनी जरांगे पाटील बीपी कमी आहे, पाठदुखीचा त्रास आहे, त्यामुळे त्यांचे सिटी स्कॅन करण्यात येणार आहे. रिपोर्ट आल्यावर त्यांच्यावर पुढचे उपचार केले जाणार असल्याचे सांगितले. त्रास जाणवतोय, अस्वस्थता वाटतेय पण मी शनिवारी धाराशिवच्या मोर्चाला जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.