
सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती, थेट हत्येशी कनेक्शन?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्येच्या मागे वाल्मिक कराड मास्टरमाइंड असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. मात्र हत्येशी कराडचा संबंध असल्याचा एकही पुरावा आतापर्यंत पोलिसांकडे हाती लागला नाही.
मात्र आता वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण एसआयटी तपासात पोलिसांना वाल्मिक कराड आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्यातील थेट कनेक्शन आढळलं आहे. त्यामुळे त्यामुळे वाल्मिक कराडचा संबंध संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडला जाऊ शकतो.
पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याच्या प्रकरणातून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. हा वाद होण्यापूर्वी म्हणजेच 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले याने दोन वेळा वाल्मिक कराडशी फोनवरून संवाद साधला होता. त्याने पवनचक्की कंपनीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण करण्यापूर्वी कराडशी फोनवरून संवाद साधला होता. यानंतर इथे सुदर्शन घुले आणि सरपंच देशमुख यांच्यात वाद झाला. या वादानंतर पुन्हा एकदा सुदर्शन घुले यानं वाल्मिक कराडशी संपर्क साधला होता. हे एसआयटी तपासातून समोर आलं आहे.
खरं तर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि २ कोटींचं खंडणी प्रकरणात सीआयडी आणि एसआयटी तपास करत आहे. आता एसआयटीला मोठा पुरावा सापडला आहे. सुदर्शन घुले यानं सुरक्षा रक्षकावर हल्ला करण्याआधी कराडला फोन केला होता आणि हल्ला केल्यानंतर पुन्हा एकदा फोन केला होता. याच वादातून सरपंच देशमुख यांची सुदर्शन घुलेनं हत्या केल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे या हत्येशी आता वाल्मिक कराडचा थेट संबंध जोडला जाऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
याआधी खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याने वाल्मिक कराड विरोधात मोठी कबुली दिली आहे. वाल्मिक कराडचं आपल्या फोनवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं, अशी कबुली चाटे यानं दिली होती. यानंतर आता सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. लवकरच एसआयटी हे पुरावे कोर्टात सादर करणार आहेत. यानंतर वाल्मिक कराड याचं सरपंच खून प्रकरणात नाव जोडलं जाऊ शकतं.