
अजित पवारांच्या पीएसोबत घडला भलताच कांड
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी यांच्यासोबत भलताच कांड घडला आहे. माजी आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या फेसबूक खात्यावरून आलेल्या एका मेसेजमुळे कुलकर्णी यांना ७५ हजार रुपये गमवावे लागले आहेत.
एका सायबर चोरट्याने प्रवीण परदेशी यांचं फेसबूक अकाऊंट हॅक केलं होतं. यातून आरोपीनं जुनं फर्निचर सामान कमी पैशांत विकायचं असल्याचं सांगून कुलकर्णी यांना गंडा घातला आहे. आपल्याशी प्रवीण परदेशी नव्हे तर एक सायबर चोरटा बोलत आहे, हे कळेपर्यंत कुलकर्णी यांच्या खात्यातून ७५ हजार रुपये गेले होते.
नेमकं प्रकरण काय आहे?
अजित पवारांचे स्वीय सहाय्यक विनायक कुलकर्णी हे नुकतंच हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात होते. २२ डिसेंबर रोजी ते आपले सहकारी आणि आयटी इंजिनिअर आलम खान यांच्यासोबत जेवण करत होते. यावेळी प्रवीण परदेशी यांच्या फेसबूक अकाऊंटवरून आलम खान यांना एक मेसेज आला. सीआरपीएफच्या असिस्टंट कमांडरची बदली झाल्याने त्याला सोफा, एसी, कपाट, फ्रीज, टीव्ही, डायनिंग टेबल, सायकल, इन्व्हर्टर अशा गोष्टी विकायच्या असल्याचं मेसेजवर सांगण्यात आलं.
तसेच या सगळ्या महागड्या वस्तू अवघ्या एक लाख ५ हजार रुपयांत देणार असल्याचं प्रवीण परदेशी यांच्या अकाऊंटवरून सांगण्यात आलं. माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या अकाऊंटवरून मेसेज आल्याने कुलकर्णी आणि आलम खान यांचा यावर विश्वास बसला. कुलकर्णी यांनी हे सामान विकत घेण्याची तयारी दाखवली. त्यानुसार आलम खान यांनी परदेशी यांच्या फेसबूक अकाऊंटवर तसा मेसेज केला.
काही वेळाने कुलकर्णी यांना एक वॉट्सअॅप मेसेज आला. समोरील व्यक्तीने आपण सीआरपीएफमधील असिस्टंट कमांडन्ट संतोष कुमार बोलत असल्याचं सांगितलं. त्यानुसार कुलकर्णी यांनी यूपीआय ट्रान्झिक्शन करत आरोपीला ५० हजार रुपये पाठवले. त्यानंतर आरोपीनं पॅकिंगसाठी पैसे लागतील, असं कारण सांगून कुलकर्णी यांच्याकडून आणखी २५ हजार रुपये उकळले. दोन दिवसांनी कुलकर्णी यांच्या नवीन घरी या सामानाची डिलिव्हरी होणार होती. मात्र २४ डिसेंबरला डिलीव्हरी झाली नाही.
त्यांनी संतोषकुमारला फोन केला असता त्याचा फोन बंद लागला. यामुळे विनायक कुलकर्णी यांनी प्रवीण परदेशी यांना फोन करून याबाबत विचारणा केली. पण यानंतर परदेशी यांचं अकाऊंट हॅक करून अज्ञात सायबर चोरट्याने कुलकर्णी यांना गंडा घातल्याचं समोर आलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.