
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टाकला डाव!
दौंडचा विकास झाला नाही, बारामती चा विकास बघा अशी टिका काही जण करत असतात, दौंडचे नेते मंडळी लक्ष घालत नसल्याने दौंडचा विकास होत नाही, मात्र मी जर लक्ष घातले तर बारामतीप्रमाणे दौंड तालुक्याचा विकास करेल.
असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या १ कोटी ९५ लाख रूपये खर्चाच्या दोन मजली बहुउद्देशीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.याप्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी आमदार रमेश थोरात, दौंड विकास सहकारी सोसायटीच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे, उपाध्यक्षा अलका काटे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले दौंड तालुक्याचा मला पण विकास करायचा आहे. परंतु ते करताना विकासकामांसाठी जनतेने साथ दिली पाहिजे. अष्टविनायक व अन्य मार्गासाठी शेतकरी जागा सोडत नाही. तरी पण जी विकासकामे शक्य आहेत, ती मी केलेली आहेत. मी जर लक्ष घातले तर अतिक्रमणे काढणार, रस्ते रुंद करणार आणि आर्थिकदृष्ट्या मागासांना शासकीय योजनेतून घरे बांधून देईन.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामंपचायतचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या तपास न्यायालयीन चौकशी समिती, विशेष तपास पथक (एसआयटी) व राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) अशा तीन पातळ्यांवर सुरू आहे. हत्या प्रकरणात कोणा पर्यंतही धागेदोरे गेले पोचले तरी त्याला माफ केले जाणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकलं का?
दरम्यान, अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच एका ग्रामस्थाने कर्जमाफीची मागणी केली. त्यावर माझ्या भाषणात तुम्ही कधी कर्जमाफीचा विषय ऐकलं का? अशी टिप्पणी त्यांनी केली. निवडणुकीत मी जी भाषणे केली त्यामध्ये लाडकी बहीण योजना, वीजबित माफी, आदी योजना होत्या त्या सुरूच राहणार अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोलताना अजित पवार म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात ७.५ अश्वशक्ती
क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपाचे वीजबिल माफी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून शेतकऱ्यांचे तीन ते चार तासांपर्यंतचे वीजबिल पूर्णपणे माफ झालेले आहे. यापुढे शेतकऱ्यांना वीज मोफत आणि तीही दिवसा उपलब्ध करून देण्यासाठी महायुती प्रयत्न करीत आहे. मला गरजूंना वीजबित माफी द्यायची आहे. परंतु जो प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरतो त्याला वीज फुकट देणे भारी पडणार आहे व त्यावर निर्णय होईल.