आगामी निवडणुकांत होणार का फायदा?
उसाला पहिली उचल कमी दिल्याच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमेश्वर व माळेगाव कारखान्याच्या संचालकांशी शनिवारी (ता. ११) चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.
या दोन्ही बैठकांमधून सुळे या प्रथमच साखरेच्या राजकारणात प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या दोन्ही कारखान्यांवर होणाऱ्या सुळे यांच्या बैठका आगामी निवडणुकांत काय होणार आहे, याची चुणूक दाखवणाऱ्या ठरणार आहेत.
सोमेश्वर व माळेगाव कारखान्याने उसाला पहिली उचल प्रतिटन २८०० रूपये देण्याचा आणि हंगाम संपल्यावर सुमारे ३५० रूपये प्रतिटन अदा करण्याचा समान पध्दतीचा निर्णय घेतला आहे. बारामती तालुक्यातील या दोन्ही कारखान्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळांचे निर्विवाद वर्चस्व आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे व आमदार रोहित पवार यांनी बारामती तालुक्यातील कारखाने, सर्व सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे सांगितले होते.
विधानसभा निवडणुकीनंतर मात्र काही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटात शांतता पसरली होती. या पार्श्वभूमीवर सोमेश्वर व माळेगाव या दोन्ही कारखान्यांवर सुळे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. सकाळी अकरा वाजता सोमेश्वरला, तर दुपारी एक वाजता माळेगावला भेट घडणार असल्याची माहिती, पक्षाच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांनी दिली.
