
शरद पवारांच्या नेत्याचा सरकारवर हल्लाबोल
बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला एक महिना उलटल्यानंतर देखील एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच या प्रकरणातील मास्टरमाईंडवर अद्याप कारवाईचा फार्स आवळला गेला नसल्याचा आरोप करत आज मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत सरकारला इशारा दिला.
धनंजय देशमुख यांनी भाऊ संतोष देशमुखला न्याय मिळावा यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या आंदोलनानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील प्रतिक्रिया आली आहे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे.
रोहित पवार म्हणाले, मस्साजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख कुटुंबावर आंदोलन करण्याची वेळ येणे हे खूप दुर्दैवी आहे. परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. न्याय देणारी व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याची भूमिका घेत असेल तर देशमुख कुटुंबाकडे आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय काय आहे? हे सरकारनेच सांगावं, असं रोहित पवार म्हणाले.
राज्यभरातील नागरिकांच्या भावना तीव्र असताना, आरोपी कोण, सूत्रधार कोण, तपास कसा होतोय, हे सर्वांना माहित असतानाही सरकार केवळ राजकीय तडजोडीसाठी भूमिका घेत नसेल तर याहून मोठं दुर्दैव काय असू शकतं? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आता गुळगुळीत मिळमिळीत भूमिका घेण्यापेक्षा कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. या घटनेत दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर इतिहास तुम्हाला कधी माफ तर करणारच नाही शिवाय गुन्हेगारापेक्षा अधिकचा दोष गुन्हेगारांना वाचवल्यामुळे तुमच्या माथी लागेल, हेही लक्षात असू द्या, असं रोहित पवार म्हणाले.