
मस्साजोग खंडणी प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड यांच्या आईने सकाळपासून परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरल्यानंतर या ठिय्या आंदोलनाच्या समर्थनात परळी व तालुक्यातील विविध गावातून कराड समर्थक मोठ्या संख्येने परळी शहरात दाखल झाले.
यावेळी सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
पोलीस ठाण्यासमोर कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला. या ठिकाणची गर्दी वाढताना दिसत असून, मोठ्या संख्येने महिलाही या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत, तर दुसरीकडे शहरातील विविध चौकांमध्ये हे कराड समर्थक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक आंदोलन करताना दिसत आहेत.
दरम्यान पोलीस ठाण्यासमोर जमा झालेल्या कराड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली असुन, या आंदोलन स्थळी सहभागी कराड समर्थक महिलांनी आमदार सुरेश धस व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरुद्ध जोरदार घोषणा देत त्यांच्या प्रतिमांना जोडे मारून आंदोलन केले आहे. एकंदरीतच कराड समर्थक आता परळीत आक्रमक होताना दिसत असुन पोलिसांनी ठिकठिकाणी मोठा बंदोबस्तही लावला आहे.