वाल्मिकच्या पत्नीची दुसरी बाजू
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात राजकारणी नेते आणि काही लोक माझ्या पतीवर अनेक आरोप करतात. परंतु खरेच माझ्या पतीविरोधात पोलिसांकडे पुरावे आहेत का? असा सवाल करून याप्रकरणात केवळ जातीयवाद होत असल्याचे वाल्मिक कराड याच्या पत्नीने म्हटले.
शिवाय मी मराठ्याचीच आहे, वंजारीसारख्या सामान्य जातीला कशाला टार्गेट करता? असे मराठा समाजाला उद्देशून वाल्मिकच्या पत्नीने म्हटले.
वाल्मिक कराड याच्यावर मकोका आणि हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून त्याच्या सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आली. खंडणी प्रकरणात वाल्मिकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर खून प्रकरणात चौकशीसाठी त्याचा ताबा सीआयडीने मागितला. या सर्व घडामोडी केजमध्ये सुरू असताना इकडे परळीत कराड कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा धारण करून परळी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला. कराड याची पत्नी, आई आणि सून यांनी माध्यमांना आक्रमक प्रतिक्रिया देऊन आम्हाला केवळ राजकारणापोटी अडकविण्यात येत असल्याचे म्हटले.
मी मराठ्याचीच आहे, वंजारीसारख्या सामान्य जातीला कशाला टार्गेट करता?
खंडणी आणि खून प्रकरणात वाल्मिक कराड यांचा म्हणजे माझ्या पतीचा कुठलाही सहभाग नाही पण केवळ राजकारणातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप करून जातीयवादाची शिकार आम्ही ठरत आहोत. समोरील लोक मराठा समाजाचा आधार घेऊन आंदोलने करत आहेत. पण मी पण मराठ्याचीच आहे. मी माझ्या जातबांधवांना सांगू इच्छितो की वंजारीसारख्या छोट्या जातीला कशाला टार्गेट करता? त्यांना लक्ष्य करू नका. राजकारणातून हे सगळे होत आहे, अशी बाजू वाल्मिकच्या पत्नीने मांडली.
गुन्हेगाराला कोणतीही जात नसते. ज्यावेळी गुन्हा घडत असतो त्यावेळी मारणारा आणि मरणारा कोणत्या जातीचा आहे म्हणून हा प्रकार होत नसतो. त्यांच्या त्यांच्या प्रकरणातून, भानगडीतून आणि तत्कालिन परिस्थितीतून हे सगळं घडत असतं. जात बघून कुणाला आरोपी केले जात नसते आणि जात बघून कुणाला मारलेही जात नाही, असेही वाल्मिकच्या पत्नी म्हणाली.
जात बघून तुम्ही एखाद्याला तुरुंगात डांबणार आहात का?
जर समोरील लोक आंदोलन आणि आक्रमक पवित्रा घेऊन न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर दबाव टाकत असतील तर आम्हालाही तसाच मार्ग स्वीकारावा लागेल. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. महिनाभर आम्ही कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिलेली नव्हती. पोलीसही त्यांचे काम करत होते. परंतु सगळ्याच गोष्टींना विरोध करून आपल्या मनाप्रमाणे करून घेण्याची समोरील लोकांना गरज वाटत आहे. मग जात बघून तुम्ही एखाद्याला तुरुंगात डांबणार आहात का? असा प्रश्न वाल्मिकच्या पत्नीने विचारला.
