
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे पाऊल पोलीस प्रशासनाने उचलले असून त्याच्यावर मकोकाअंतर्गत गुन्हाही दाखल होणार आहे.
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे तर देशमुख खून प्रकरणात त्याचा ताबा गुन्हे अन्वेषण विभागाने मागितलेला आहे. या सगळ्या घडामोडी केजमध्ये घडत असताना इकडे परळीत कराडच्या कुटुंबियांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेऊन देशमुख कुटुंबाला आंदोलनावरून सुनावले आणि पोलीस प्रशासनालाही कडक इशारा दिला.
जातीयवादाचा आरोप, वाल्मिक कराडची सून संतापली
तुम्ही (देशमुख कुटुंब) आंदोलन करताय, टाक्यावर चढताय, कुठे मोर्चे काढताय… असे करून न्याय व्यवस्था निर्णय घेत असते का? ही कुठली पद्धत आहे? अशी संतापजनक प्रतिक्रिया वाल्मिक कराडच्या सूनेने न्यूज १८ लोकमतशी बोलताना व्यक्त केली. पुरावे असतील तर कारवाई करण्याला आमची काही हरकत नाही पण त्यासाठी दबाव निर्माण करून गुन्हे दाखल होत असतील तर असे करणे योग्य नाही, असेही वाल्मिकची सून म्हणाली.
गेले एक महिना आम्ही सगळे शांत होतो, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास होता आणि आहे… पण असले मोर्चे आंदोलने करून कुणीही खोटे गुन्हे दाखल करेल.. जोपर्यंत खोटे गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही परळी पोलीस स्टेशनसमोरून उठणार नाही, असा आक्रमक पवित्रा वाल्मिकच्या सूनेने बोलून दाखवला.
वाल्मिक कराडच्या सूनेचा पोलिसांना इशारा
अण्णांच्या आईची तब्येत खराब आहे. त्यांना दवाखान्यात घेऊन जा, असे आम्हाला सांगण्यात येत आहे. परंतु आई दवाखान्यात जायला नकार देत आहेत. त्यांना दम्याचा, गुडघ्याचा आणि रक्तदाबाचा त्रास आहे. रात्रीपासून त्यांनी पाणीही प्यायलेले नाही. सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे. आज जर वाल्मिक अण्णांच्या आईला काही झाले तर त्याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही कराडच्या सूनेने दिला.
माध्यमांवर बदनामीचे खापर
गेली एक महिना झाले आम्ही मीडियातून आमच्या अण्णांबद्दल काहीही ऐकतोय. अण्णा कसा माणूस आहे ते तुम्ही येथील माणसांना विचारा.. माध्यमांनी आम्हाला मानसिक त्रास देण्याचे बंद करावे, अशा शब्दात बदनामीचे खापर त्यांनी माध्यमांवर फोडले. तसेच हे सगळे राजकारण चालू आहे. ओबीसी आणि मराठा सगळे एकत्रित आहोत. कशासाठी जातीयवाद करताय? असा सवालही कराडच्या सूनेने विचारला.
...तर आम्ही कुटुंब म्हणून शांत बसणार नाही
आम्हाला मकोका आणि ३०२ नकोय. जर पुरावे असतील तर गुन्हा दाखल करा. केवळ राजकारण आणि दबावातून त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार असतील तर आम्ही कुटुंब म्हणून शांत बसणार नाही. बाकी न्याय व्यवस्था जो देईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे कराडच्या सूनेने म्हटले.