
वाल्मीक कराडच्या पत्नीचा संताप
खंडणीप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मीक कराड याच्यावर ‘मकोका’ लावण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
वाल्मीक कराड याची आई पारूबाई आणि पत्नीने परळी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले.
वाल्मीक कराड याच्याविरोधात फास आवळला जात असताना त्याच्या पत्नीचा संयम सुटत असल्याचे दिसून आले.
परळीत माध्यमांशी बोलताना वाल्मीक कराडच्या पत्नीने काही राजकीय व्यक्तींवर राग व्यक्त केल्याचे दिसून आले. ‘तुम्हाला निवडून यायला, मोठं व्हायला अण्णा पाहिजे, आता त्याच अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचे का? तुम्ही आमच्या घरी नेहमी येत होतात.
ते पण अनेकदा आले, मग आज तुम्ही राजकारणासाठी अण्णाचा बळी का द्यायला निघालात? माझ्या माणसाचे मरण का करता? तुम्हाला काय राजकारण करायचे ते मुंबईत बसून करा’, अशा शब्दांत कराड याच्या पत्नीने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे सर्वज्ञात असल्याची चर्चा नंतर राजकीय गोटात रंगली.