
हाताला त्रास तरीही सोडली नाही साथ, नक्की प्रकार काय?
टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळी याचा आज वाढदिवस आहे. कांबळीने 18 जानेवारीला वयाची 53 वर्ष पूर्ण केली आहेत. कांबळीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची अप्रतिम सुरुवात केली. मात्र कांबळीला तसाच शेवट करता आला नाही.
कांबळीची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. मात्र जेव्हा जेव्हा कांबळी खेळलाय तेव्हा तेव्हा त्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कांबळी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तब्येतीमुळे चर्चेत राहिला. कांबळीला महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृती शिल्पाच्या कार्यक्रमावेळेस चालतानाही त्रास जाणवत होता. त्यानंतर कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कांबळीने इथे आजारावर मात केली आणि घरी परतला. त्यानंतर कांबळी काही दिवसांपूर्वी वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात उपस्थित होता. कांबळीच्या वाढदिवसानिमित्ताने आपण आज त्याचं 9 या आकड्यासह असलेलं खास कनेक्शन जाणून घेऊयात.
कांबळीचं 9 नंबरसह काय खास कनेक्शन होतं? कांबळी बॅटवर 9-9 ग्रिप का लावायचा? याबाबतही जाणून घेऊयात. कांबळीने एका मुलाखतीत 9 नंबरसह असलेलं खास कनेक्शनबाबत सांगितलं होतं. माझा 9+9, 18 हा आवडता नंबर आहे. कांबळीची जन्मतारीख ही 18 जानेवारी आहे.
विनोद कांबळी आणि 9 नंबर
विनोद कांबळी बॅटला 9-9 ग्रिप लावून खेळायचा. स्वत: कांबळीने याबाबत सांगितलं होतं. कांबळीची 1-2 ग्रिपमुळे बॅटवर घट्ट पकड नसायची, त्यामुळे तो 9-9 ग्रिप लावायचा. मला 9 ग्रिप चढवायला दीड तास लागायचा. त्यामुळे हातावर फोड यायचे. मी 9 ग्रिपसह हिरो कपमध्ये धावा केल्या होत्या. मला हे योग्य वाटलं आणि 9 हा आकडा निश्चित झाला, असं कांबळीने सांगितलं होतं.
वनडेत 9 वेळा कमबॅक
दरम्यान कांबळीने टीम इंडियात 1-2 नाही, तर तब्बल 9 वेळा कमबॅक केलंय. याबाबतही स्वत: कांबळीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. “मी निवड समितीचा आभारी आहे की त्यांनी मला इतकी संधी दिली. मी 9 वेळा कमबॅक करुन मोहिंदर अमरनाथ यांचा रेकॉर्ड ब्रेक केला, त्यांनी 8 वेळा पुनरागमन केलंय” कांबळीला एका मुलाखतीत त्याच्या 9 कमबॅकबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा कांबळीने हे उत्तर दिलं होतं.