
उत्तमराव जानकर आमदारकीचा राजीनामा देणार
मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्यासाठी माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अशातच आता उत्तम जानकर आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. उत्तम जानकर निवडणूक आयोगाकडे राजीनामा सोपवणार आहेत. काही दिवसांपूर्वी जानकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी जानकर यांनी मोठं पाऊल उचललं आहे. तसेच जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलाय.
धानोरे ग्रामसभेत हात वर करून मतदान
मारकडवाडीनंतर धानोरे गावात देखील ईव्हीएम विरोधात आवाज उठवण्यात आला होता. माळशिरस तालुक्यातील धानोरे गावच्या ग्रामसभेने ईव्हीएम विरोधात ठराव मांडला. त्यावेळी धानोरे ग्रामसभेत हात वर करून जानकरांना मतदान झालं होतं. त्यावेळी प्रत्यक्ष मतदान अन् ग्रामसभेतील मतदानात 243 मतांचा फरक दिसून आला होता. धानोरे गावातील 1206 लोकांनी ईव्हीएम विरोधात प्रतिज्ञापत्र देखील सादर केलं आहे. धानोरे मधील मतदारांनी हात वर करून मतदान केले आहे. त्यात 1206 मतदारांनी हात वर केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष 963 मते मिळाली होती.
जर मॉक पोलसाठी परवानगी मिळणार नसेल तर आमदार उत्तम जानकर हे बॅलेट पेपर वर मतदान घेण्याच्या अटीवर आमदारकीचा राजीनामा मुख्य निवडणूक आयुक्त याना देणार आहेत. जर मागणी मान्य नाही झाली तर 23 जानेवारीपासून दिल्ली येथील जंतर मंतरवर आंदोलन सुरू करण्याचा इशारा आमदार जानकर यांनी दिला आहे.
उत्तमराव जानकर विरुद्ध राम सातपुते
विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघात शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर विरुद्ध भाजपचे राम सातपुते असा सामना झाला होता. यामध्ये उत्तमराव जानकरांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर मारकडवाडी येथे बॅलेट पेपरवर मतदान करण्यात यावं यासाठी मारकडवाजी गावाने 29 नोव्हेंबरपासून आंदोलनाला सुरुवात केली होती. अपेक्षेप्रमाणे कमी मतं मिळाल्याचा आरोप उत्तमराव जानकरांनी केला होता.
बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी
दरम्यान, प्रशासनाच्या विरोधानंतर मारकडवाडी गावात बॅलेट पेपरवर मतदान झालं नाही. मात्र, उत्तमराव जानकर यांनी वारंवार बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. अशातच आता उत्तमराव जानकरांनी मोठं पाऊल उचललं असून त्यांनी थेट आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता मारकडवाडी आणखी पेटणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.