
सरकारने ‘ती’ अडचण दूर केली…
महायुती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. पालकमंत्री पदाच्या नियुक्त्यांनंतर चोवीस तासांच्या आत रायगड आणि नाशिकच्या नियुक्त्यांना स्थगित देण्यात आली.
मंत्री आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांचा हा एकप्रकारे अपमानच आहे. विरोधकांकडूनही तशीच टीका होत आहे. पण या नियुक्त्या स्थगित झाल्याने प्रशासनासमोर एक मोठी अडचण निर्माण झाली होती.
भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी राष्ट्रध्वजारोहण होणार आहे. पालकमंत्र्यांना ध्वजारोहणाचा मान मिळतो. शनिवारच्या नियुक्त्या कायम राहिल्या असत्या तर रायगडमध्ये आदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्री म्हणून ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली होती.
दोघांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याने प्रशासनासमोर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यावर अखेर सरकारने तोडगा काढला आहे. ता. 26 जानेवारीला नाशिक आणि रायगड येथे अनुक्रमे गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांनाच ध्वजारोहणाचा मान देण्यात आला आहे. तसेच परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने काढले आहे.
नवे पालकमंत्री कधी?
सरकारच्या या परिपत्रकामुळे रायगड आणि नाशिकला किमान २६ जानेवारीपर्यंत तरी पालकमंत्री मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये आहेत. ते परत आल्यानंतरच यावर तोडगा निघू शकतो. फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच पालकमंत्रिपदाचा निर्णय घेतील. या नियुक्त्यांवरून पुन्हा वाद होऊ नये, याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे.
गोगावले, भुसेंना संधी?
रायगडसाठी भरत गोगावले तर नाशिकसाठी दादा भुसे हे शिवसेनेचे मंत्री इच्छूक आहेत. या दोघांना तिथे संधी द्यायची झाल्यास तटकरे आणि महाजन यांना कोणता जिल्हा दिला जाणार, हा प्रश्नच आहे. इतर पालकमंत्री बदलण्याची नामुष्की सरकारवर ओढवू नये, यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. त्यामुळे हा तिढा कसा सुटणार, हा मोठा प्रश्न आहे.