
Jitendra Awhad यांनी शेअर केलेल्या ‘त्या’ व्हिडिओमुळे खळबळ
खंडणीप्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या वाल्मिक कराडचे दररोज नवनवीन कारनामे समोर येत आहेत. यातील जवळपास सर्वच कारनामे थक्क करणारे आहेत. आजही त्याचा असाच एक कारनामा समोर आला आहे.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यात 29 जून 2024 रोजी महादेव गित्ते याच्यावर वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा व्हिडिओ आव्हाड यांनी शेअर केला आहे.
आव्हाड यांच्या व्हिडिओमुळे सध्या मोठी खळबळ उडाली आहे, यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, बीडच्या परळी तालुक्यातील मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून 2024 रोजी गोळीबार केला होता.
परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेत बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी महादेव गित्ते, मुकुंद गित्ते, बबन गित्ते, राजाभाऊ निहरकर आणि राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
तसेच परस्पर विरोधी नोंदवण्यात आलेल्या तक्रारीमध्ये वाल्मिक कराडवर देखील गुन्हा दाखल केला होता. पण कराडचा सहभाग या प्रकरणात सापडला नसल्याने पोलिसांनी त्याचे नाव वगळले होते. पण आता आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.