
जगन मोहन रेड्डी यांचा जवळचा नेता घेणार राजकीय संन्यास, जमीन कसून पिकवणार सोनं
शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय आहे, असे अनेक शेतकरी म्हणतात. तर दुसरीकडे अमेरिकेत अथवा आयटीतील गल्लेलठ्ठ पॅकेज सोडून अनेक जण गावखेड्यात शेती व्यवसायात उतरलेले दिसत आहेत.
या विरोधाभासातच आता राज्यसभेतील एका खासदाराने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ईडीने काही दिवसांपूर्वी त्यांना चौकशीसाठी पाचारण केले होते. पण त्यांच्या या भूमिकेने राजकीय नेत्यांना अजून धक्का दिला आहे.
जगन मोहन रेड्डींचे मित्र
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या विश्वासू व्ही. विजयसाई रेड्डी यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने सर्वांनाच धक्का बसला. 25 जानेवरी, 2025 रोजी ते राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
विजयसाई हे व्यवसायाने सनदी लेखापाल (Chartered Accountant) आहेत. ते अनेक वर्षांपासून वाय एस. कुटुंबाचे अगदी जवळचे आहेत. ते दिवंगत वाय. एस. राजशेखर रेड्डी आणि त्यांचे मुलगा वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. हा निर्णय पूर्णपणे व्यक्तिगत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी राजकीय संन्यास घेतल्यानंतर काय करणार याची पण घोषणा केली आहे.
रेड्डी यांची ईडीकडून चौकशी
दरम्यान काकीनाडा सी पोर्टप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. या पोर्ट्स लिमिटेडचे जे प्रमोटर्स आहेत, त्यांच्यावर शेअर कमी किंमतीत विक्री करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. याप्रकरणात रेड्डी हे तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले होते. त्यांनी हे आरोप फेटाळले.
राजकीय संन्यास घेतल्यानंतर थेट राजीनामा
कोणतेही पद, लाभासाठी, दबाव टाकण्यासाठी अथवा राजकीय फायद्यासाठी आपण राजीनामा देत नसल्याचे तसेच इतर कोणत्याही पक्षात प्रवेशासाठी आपण राजीनामा देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी आपली शेती करण्यात आवड होती. आता राजीनामा दिल्यानंतर आपण शेतीवर लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता शेती करून चांगलं उत्पादन घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितलं.