राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जून 2023 मध्ये उभी फुट पडली होती. त्यावेळी अजित पवार यांच्या सोबत पक्षातील 40 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केले होते. यावेळी अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्वच नेतेमंडळींनी महायुतीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.
त्यावेळी अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद तर इतर नऊ जणांना मंत्रिपद मिळाले. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फुटीनंतर अजित पवार यांच्या गटाला सर्वोच्च न्यायालयाने व विधानसभा अध्यक्षाने देखील अधिकृत राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून केवळ पाच वर्षाचा अपवाद वगळला तर सत्तेत राहणारा पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख बनवून राहिली आहे.
पक्ष फुटीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी केवळ एक जागा पदरात पडली होती तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे लोकसभेत काहीसा बॅकफूटला गेलेल्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. पक्ष स्थापनेपासूनच जिंकून येणाऱ्या नेत्याचा पक्ष अशीच ओळख या पक्षाची राहिली आहे.
त्यामुळे येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे ‘नेत्यांचा पक्ष ऐवजी कार्यकर्त्यांचा पक्ष’ अशी वेगळी ओळख निर्माण करण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे असणार आहे. त्यामुळेच आता येत्या काळात पक्षाचा कायापालट करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी नव्याने बूथ रचना निर्माण करीत तळागाळातीत कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी देण्याची भूमिका घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला विधानसभा निवडणुकीत एक प्रकारे पुनर्जीवन लाभले आहे. त्यामुळेच येत्या काळात कात टाकत राष्ट्रवादीने या संधीची सोने करण्यासाठी व पक्ष संघटना बळकट करण्याच्या प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. त्यासाठी येत्या काळात आता राज्यातील जवळपास लाखभर बुथवर प्रमुखाची नेमणूक करून त्यांचे हाताखाली काम करण्यासाठी प्रत्येकी 25 कार्यकर्त्यांची नियुक्ती करून पक्ष वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी व त्याचा पाठपुरावा करण्यासाठी स्वतंत्र पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
नेते व कार्यकर्ते यांच्यात असलेल्या दरीवरून नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली जात होती. त्यामुळे आता अजितदादांनी काही संघटनात्मक बदल केले आहेत. त्यामुळे राज्यातील 96 हजारावर अधिक असलेल्या बुथवर एका कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यांच्यावर 25 कार्यकर्त्यांची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. या 25 कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रभागातील किमान दहा घरापर्यंत पोहोचून पक्षाची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करून येत्या काळात पक्षाची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. विरोधकांकडून या जाहीरनाम्याचे पुढे काय झाले ? याची विचारणा करण्यात येऊ लागली आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीमध्ये कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असून तो टाळण्यासाठी नवीन रचना अजितदादांनी केली आहे. प्रत्येक मतदारसंघात आश्वासनाच्या पुर्तेतेसाठी पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून नेत्याचा पक्ष म्हणून विरोधकाकडून टीका केली जाते. त्यामुळे पक्ष नेत्याभोवती केंद्रित न राहता कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान असावे यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. पक्षाच्या वाढीसाठी बूथनिहाय रचना करण्यासोबतच निवडून आलेल्या आमदारांना देखील आपल्या कामावर कोणाचे तरी लक्ष असावे यासाठी ही रचना करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीत दिलेल्या आश्वासनपूर्तीसाठी स्वतंत्र पदाधिकारी व नेत्यांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष बनण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामाध्यमातून येत्या काळात पक्ष विस्तार व संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.
