
‘या’ तारखेपर्यंत अर्ज करता येणार
महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. राज्यातील शेतकऱ्यांसाठी देखील राज्य शासन विविध योजना राबवते.
ट्रॅक्टर खरेदीसाठी देखील राज्य शासनाकडून अनुदान दिले जात आहे.
राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक विशेष ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील बचत गटांना अनुदानावर मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने दिली जात आहेत.
दरम्यान याच मिनी ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मराठवाडा विभागातील नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
यामुळे जे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत असे आवाहन नांदेड जिल्ह्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कसे आहे योजनेचे स्वरूप?
महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्गातील बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राबवली जाते.
या योजनेत मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यासाठीचा खर्च साडेतीन लाख रुपये ग्राह्य धरला जातो अन यानुसार 90 टक्के अनुदान म्हणजेच कमाल 03 लाख 15 हजार रुपयांच अनुदान पात्र ठरणाऱ्या बचत गटांना दिले जाते. उर्वरित रक्कम ही संबंधित बचत गटांना भरावी लागते. आता आपण या योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे थोडक्यात समजून घेणार आहोत.
अर्ज कसा करावा लागणार?
जे बचत गट या योजनेसाठी पात्र ठरतात त्यांना शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करायचा आहे. https://mini.mahasamajkalyan.in/register.aspx
या वेबसाईटवर अर्जदारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
पण नांदेड जिल्ह्यातील अर्जदारांना फक्त 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येईल याची नोंद घ्यायची आहे. दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची एक झेरॉक्स कॉपी आणि अर्ज सादर करताना दिलेल्या आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात सादर करावी लागणार आहे.
योजनेच्या अटी कशा आहेत?
या योजनेसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक अर्ज आले तर लाभार्थ्यांची निवड ही लॉटरी पद्धतीने होणार आहे. ज्याप्रमाणे महाडीबीटीवर अर्जदारांची निवड लॉटरी पद्धतीने होते त्याचप्रमाणे आर्थिक उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज आलेत तर या योजनेच्या लाभार्थ्यांची निवड सुद्धा लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे.
तसेच, या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे राहवासी असणे आवश्यक आहे. एवढेच नाही तर अशा स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. महत्त्वाची बाब अशी की बचत गटाचे अध्यक्ष सचिव अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे अनिवार्य आहे.