दै.चालु वार्ता
पैठण प्रतिनिधी तुषार नाटकर
पैठण : बीड जिल्ह्यातील मस्साजोग (मस्साजोग) येथे छावा क्रांतिवीर सेनेच्या संस्थापक अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने कै. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देत माणुसकीचे दर्शन घडवण्यात आले. कै.संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अशा परिस्थितीत त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी संघटनेने ही मदत केली.या कृतीतून छावा क्रांतिवीर सेनेने कुटुंबीयांशी आपुलकीचे नाते जपले आहे.
कै.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी आणि न्याय मिळेपर्यंत छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्रभर आंदोलन करत राहील,अशी ठाम भूमिका यावेळी संघटनेने मांडली.मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत संघटना कुठेही न थांबता शेवटपर्यंत लढा देईल,अशी ग्वाही दिली.यासाठी राज्यभर व्यापक स्तरावर आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
देशमुख कुटुंबीयांना भविष्यात कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास संघटनेचे पदाधिकारी तत्काळ मदतीसाठी सज्ज राहतील,असे आश्वासन देण्यात आले.मुलीच्या शिक्षणासाठी दिलेली आर्थिक मदत ही केवळ सुरुवात आहे,यापुढेही कुटुंबाला आवश्यक ती साथ देण्याचे वचन संघटनेच्या वतीने देण्यात आले.
कै.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातून विविध ठिकाणी कुटुंबीयांना सहानुभूती आणि आर्थिक मदत मिळत आहे. परंतु छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने केलेली मदत ही केवळ आर्थिक स्वरूपाची न राहता कुटुंबाच्या संघर्षात बळ देणारी आहे.संघटनेने सामाजिक उत्तरदायित्व जपत त्यांच्या परिस्थितीची दखल घेत कौटुंबिक नाते मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
या शिष्टमंडळ भेटीमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर,प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत,नाशिक जिल्हा प्रमुख आशिष हिरे,शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश माने, जालना जिल्हाप्रमुख राम पाटील गाडेकर,अखिल भारतीय छावा संघटना पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले,आयटी प्रदेश संपर्कप्रमुख वैभव दळवी,पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष हर्षद भोसले,भारत पिंगळे,ज्ञानेश्वर पालखेडे, सोमनाथ पाटील कदम,विठ्ठल राठोड,अशोक माने,सर्जेराव पाटील,दैनिक पुढारी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत अंबीलवादे आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते.संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना मानसिक आधार दिला आणि हत्येच्या प्रकरणाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या सोबत राहण्याची हमी दिली.
छावा क्रांतिवीर सेना सामाजिक न्यायासाठी नेहमीच आक्रमक राहिली आहे.या प्रकरणातही संघटनेने ठाम भूमिका घेत न्यायासाठी संघर्ष करण्याचे ठरवले आहे.देशमुख कुटुंबीयांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि मारेकऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी राज्यभर जे मोठे आंदोलन उभे राहिले आहे त्या आंदोलनात सक्रिय सहभाग संघटनेचे सर्व पदाधिकारी घेत आहेत.सामाजिक बांधिलकी आणि न्यायासाठी लढण्याच्या निर्धार छावा क्रांतिवीर सेनेचा नेहमी राहिलेला आहे. आणि तो या घटनेत शेवटच्या क्षणापर्यंत असेल.
– करण गायकर,संस्थापक अध्यक्ष,छावा क्रांतिवीर सेना
