
शिंदे समितीला मुदतवाढ, मनोज जरांगेंचे उपोषण सुरू, १० मागण्या कोणत्या?
मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता मनोज जरांगे पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरूवात झाली असून शनिवारी पहिल्याच दिवशी उपोषणस्थळी आंतरवाली सराटीमध्ये मोठी गर्दी झाली होती.
मराठा समाजाच्या १० मागण्या आम्ही सरकारपुढे ठेवलेल्या आहेत. सरकारने अध्यादेश काढून त्वरीत त्याची अंमलबजवाणी करून मराठा समाजाचे दु:ख हलके करावे, असे जरांगे म्हणाले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याही बळी प्रकरणात आपल्याला न्याय देण्याच्या भूमिकेसाठी सरकारविरोधात लढायचे असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी मुंबईत आक्रोश मोर्चा होत असताना जालन्याच्या अंबडमधील आंतरवाली सराटीमध्ये विक्रमी आठव्यांदा आमरण उपोषणाला जरांगे यांनी सुरुवात केली. याआधी माझी तब्येत बिघडल्यावर लोक गर्दी करायचे पण यावेळी उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मंडप गर्दीने फुलून गेला आहे. तुम्ही उपोषणाला बसला नाहीत तरी चालेल, फक्त मला आशीर्वाद द्या, असे जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षण-मनोज जरांगे यांच्या राज्य सरकारकडे १० मागण्या
आरक्षणाच्या मागणीकरता २५ जानेवारीपासून उपोषण सुरू झाले आहे. सगेसोयरे कायदा अंमलबजावणीसाठी जवळपास एक वर्ष लागलं. एक वर्षापासून समाज रस्त्यावर आहे. आजही मराठे त्याच ताकदीने उभे आहेत. आमच्या त्रासाची जाण सरकारला नाही. सरसकट कुणबी प्रमाण द्या. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी तातडीने लागू करा. कुणबी नोंदीच्या आधारावर त्यांना आरक्षण द्यावे, सगळ्या सगे सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे त्यामुळे मागेपुढे न पाहता कुणबी दाखले दिले जावेत, न्यायमुर्ती संपत शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, दाखल्यांसाठी विशेष कक्ष पुन्हा सुरु करा, आंदोलकरांवरील गुन्हे मागे घ्या, सातारा-औंध-मुंबई-हैद्राबाद गॅझेट लागू करा तसेच आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबाला निधी आणि शासकीय नोकरी द्या, अशा १० मागण्या जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या.
उपोषणाचे लोण राज्यात पसरणार, मुख्यमंत्री मराठ्यांशी गद्दारी करणार नाहीत ही अपेक्षा
राज्य सरकारने मराठ्यांशी बेईमानी आणि हद्दारी करू नये. आज जरी केवळ आंतरवालीत उपोषण सुरू झालेले असेल तरी सामूहिक आंदोलनाचे लोण आता राज्यात पसरेल. मुख्यमंत्री फडणवीस राज्यातील मराठ्यांशी गद्दारी करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे जरांगे म्हणाले.
सरकारशी बोलणं झालंय का?
मराठा बांधवांना माझी विनंती आहे की कुटुंबाने परवानगी दिली नसेल तर उपोषणाला बसू नका. मी एकटाच उपोषण करायला पुरेसा आहे. केवळ तुमचा आशीर्वाद आणि साथ मला द्या, असे आवाहन जरांगे यांनी केले. तसेच उपोषण सुरू करण्यापूर्वी सरकारशी कोणतेही बोलणे झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.