
किरीट सोमय्या यांचा आरोप
अकोला जिल्ह्यातून तब्बल १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना जन्म प्रमाणपत्र देणारे अकोला, अमरावती आणि मालेगाव हे मुख्य केंद्र बनले आहेत, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला.
बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र देण्याच्या घोटाळ्याचा प्रश्न राजकीय नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांविरोधात भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे एक हजार बनावट प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा आता अकोला जिल्ह्याकडे वळवला. अकोला जिल्ह्यातही बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
तब्बल १५ हजार ८४५ बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंत्रालयात पाठविलेल्या पत्राचा त्यांनी आधार घेतला. यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी सायंकाळी अकोला गाठून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेतली. या प्रकरणासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.